दिंडोरी – केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असून २० मे रोजी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. या संदर्भात पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना १९ मे पासून लाखो शेतकरी दरवाढ मागे घ्या अशा आशयाचे पत्रही लिहतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेले होते.
केंद्र सरकारने नुकतीच रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. नव्या दरामुळे शेतकर्यांचे कंबरडेच मोडणार आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन मुळे शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यातच शेतीमालाचे खूप मोठे नुकसान होत आहे. राज्य सरकारने महिन्यापासून लॉकडाऊन लावले आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. मार्केट कमिट्या बंद ठेवल्या आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका शेतकर्यांना बसलेला आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकर्यांचा अर्थकारण पूर्णपणे कोलमोडणार आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत ५० ते ६० टक्के दरवाढ झालेली आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकर्यांनी कंबर कसलेली असताना देखील ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे. डीएपीच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. २०१९ मध्ये रासायनिक खतांच्या किंमतीत ५० टक्के दरवाढ झालेली होती. आता ५० ते ६० टक्के दरवाढ केली. याच्या निषधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे. २० मे रोजी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. बांधावरून तसेच सामाजिक अंतर पाळून हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच लाखो शेतकरी १९ मे पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दरवाढ त्वरीत मागे घ्या, अशी मागणी करतील, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.