दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व तालुक्यात सकाळी ११ वाजून २१ मिनिटाने काही सेकंदात दोन वेळा मोठा आवाज झाले. त्यात मोठे हादरेही बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत अनेक जण घराबाहेर पडले. आवाजाची तीव्रता मोठी होती व त्यातच मोठे हादरे बसून घराच्या खिडक्या पत्रे घरसामान हादरले.
दिंडोरी बसस्थानक येथील बंद कॅन्टीन मधील काचा फुटल्या. हा आवाज झाला त्यानंतर काही क्षण आकाशात ही आवाज सुरु होता. सदर आवाज तालुक्यातील सर्व गावे व नाशिक शहरांत ही ऐकू आला. भूकंप झाला की विमान पडले की काही स्फ़ोट झाला याबाबत तर्कवितर्क लढवत एकमेकांना विचारणा सुरु झाली.
त्यानंतर प्रांतधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी जिल्हा प्रशासनास कळवत माहिती घेतली. मेरी कडे या आवाजाची किंवा भूकंपाची कोणतीही नोंद झाली नाही. सुपर सॉनिक बूम किंवा अन्य काही कारणाने आवाज झाला असल्याचे मेरीने कळवले तर एच.ए.एल. कडून लढावू विमानांचे सरावा वेळी सुखोई विमानाचा सुपर सॉनिक बूम झाल्याने सदर आवाज व हादरे बसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येऊन नागरिकांना घाबरू नये असे आवाहन करण्यात आले . तसेच सॉनिक बूम बाबतचा एक व्हिडीओ ही प्रसारित करण्यात आला.