महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार!
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिंडोरी हा निष्ठेला न्याय देणारा तालुका असल्याने येथे आवाज फक्त निष्ठावंतांचाच असतो म्हणूनच यंदा सुनीता चारोस्कर यांच्या रूपाने तुतारीचाच आवाज घुमुन महाविकास आघाडीचा झेंडा दिंडोरी-पेठवर फडकणार असल्याचे प्रतिपादन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी केले.
दिंडोरी हा शेती समृद्ध तालुका म्हणून ओळखला जातो.परंतु विकासाच्या बाबत सातत्याने दुय्यम दर्जा नशिबी मिळालेला हा मतदारसंघ सुनीता रामदास चारोस्कर यांच्या विकासात्मक दृष्टीतून नवी विकास गंगा आणल्याशिवाय राहणार नसून वणी दिंडोरी नाशिक महामार्ग आज अनेक कारणांनी सतत चर्चेत असतो. याच रस्त्यावर अनेक कुटुंबकर्त्यांचे अपघाती जाणे कायम स्मरणात असते याच मार्गावर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेलं आहे. या गंभीर बाबीचे थोडेही सोयरसुतक सत्ताधाऱ्यांना नाही. दोन्ही तालुक्यातील अनेक गावांत अंतर्गत रस्त्यांची सतत होणारी चाळण तितकीच गंभीर बाब आहे. समृद्ध द्राक्ष शेती हा तालुक्याचा कणा असताना येथे आताच्या लोकप्रतिनिधींनी एखादा मोठा शेती उद्योग प्रकल्प आणण्यात कायम उदासीन धोरण ठेवलं आहे. दिंडोरीत असलेल्या औद्योगिक प्रश्नांबाबत नेमकी उपाययोजना आणि स्थानिक तरुणांना कायमचा रोजगार हा तितकाच प्रमुख प्रश्न अनुत्तरित आहे.
दिंडोरीच्या अक्राळे येथे नवनवीन उद्योग येत असून तेथे तालुक्याचा दरडोई उत्पन्न उंच ठेवण्यासाठी विशिष्ठ पावले उचलून उच्चशिक्षित तरुणांना योग्य ती संधी देण्याचे धोरण हे चारोस्कर यांच्याकडे असून त्यांच्या घरात यापूर्वीही दोनवेळा आमदारकी अन् स्वतः सुनीता चारोस्कर यांनी जिल्हा परिषद सभापती म्हणून केलेली कामे त्याची साक्ष देत असल्याचेही कड यांनी सांगितले.
दिंडोरी पेठची यंदाची लढाई ही निष्ठा विरुध्द लक्ष्मी अशी असून आम्ही निष्ठा सोडली नाही अन् तालुक्यातील जनता ही सुज्ञ असून ते येत्या तेवीस तारखेला तुतारी फंकल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास कड यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील सर्वांनी यंदा शरद पवार व महाविकास आघाडी सोबत राहण्याचे ठरवले असून लोकसभेला जसा शरद पवार, श्रीराम शेटे अन् सर्वच महाविकास आघाडीतील नेत्यांचा शब्द प्रमाण ठेऊन भास्कर भगरे लोकसभेत गेले त्याच प्रकारे भविष्याचा वेध घेत सुनीता चारोस्कर या एक सुदृढ विकास धोरण आखत तो सत्यात उतरवतील अन् दिंडोरी पेठ तालुका निष्ठेला सलाम करत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला भरभरून मतांचे दान करतील असा विश्वास सभापती कड यांनी व्यक्त केला.