दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या समर्थनार्थ शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. हजारो कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले. अंदाजाच्या पलीकडे कार्यकर्ते आल्याने आयोजकांची धावपळ उडाली. यावेळी मंडपमधील खुर्च्या कमी पडल्या. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठी सुद्धा जागा कमी पडत होती. यावेळी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार रामदास चारोस्कर हे उपस्थित होते. महिला व वयोवृद्धांना खुर्च्यांवर बसवून तरुणांनी उभे राहणे पसंत केले. हजारोंच्या संख्येने तरुण उभे होते. माझा कार्यकर्ता उभा असताना मी तो उभे स्टेजवर जाणार कसा? असा प्रश्न रामदास चारोस्करांना पडला. यावेळी कार्यकर्त्यांमध्येच उभे राहून सभा ऐकायची तयारी चारोस्करांनी केली.
शरदचंद्र पवार यांचे स्टेजवर आगमन होत सभा सुरू होताच सूत्रसंचालन करणाऱ्यांनीही माजी आमदार रामदास चारोस्कर यांना स्टेजवर येण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनीदेखील ‘साहेब, तुम्ही स्टेजवर जा, आम्ही थांबतो’ अशी विनंती केली. परंतु माझ्या कार्यकर्त्याला खुर्ची नाही उभा राहून सभा बघेल तेव्हा मी स्टेजवर जाऊन खुर्चीवर कसा बसू? असा प्रतिसवाल करत मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबर येथेच उभा राहील, असा पवित्रा चारोस्करांनी घेतला.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर जवळपास तीन तास माजी आमदार रामदास चारोस्कर हे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांविषयी त्यांचा असलेला जिव्हाळा आणि त्यांच्यातील साधेपणाचे दर्शन सर्वांनाच झाले. याविषयी मतदारसंघामध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.