सुदर्शन सारडा
शरद पवारांच्या नजरेतून लोकसभेच्या दृष्टीने बारामती नंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या दिंडोरीवर दोन दशकांनी मनासारखी मोहोर उमटली खरी परंतु विधानसभेच्या दृष्टीने अभेद्य म्हणून गणल्या जाणाऱ्या याच दिंडोरीवर वेगळ्या ‘अर्थाच्या’ गटबाजीने धोका निर्माण होतोय का?असा कयास सध्या राजकीय जाणकारांच्या बोली भाषेतून जाणवू लागला आहे.यामुळंच मतदारांना आपल्या कौलाचे बटण दाबायला दहा दिवस अवकाश असताना अंतर्गत कुजबुज बंद होऊन लोकसभेची तार कायम राहील की शरद पवारांनाच वेगळा संदेश जाईल याकडे तालुक्याचे नव्हे तर सबंध जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.
दिंडोरीतून श्रीराम शेटेंचे शिष्य तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे पुन्हा महायुतीकडून नशिब आजमावत आहेत यंदाच्या त्यांच्या उमेदवारीचे वैशिठ्य म्हणजे ते शरद पवार,श्रीराम शेटे यांचे नव्हे तर अजित पवारांचे उमेदवार म्हणून रिंगणात आहे.शरद पवार यांचा अगाध विश्वास श्रीराम शेटेंवर आहे.बरीच खलबतं झाल्यानंतर शेटे यांनी अखेर आपल्या मानस कन्या सुनीता चारोस्कर यांना झिरवाळ यांच्या विरोधात रिंगणात उभे केले आहे.श्रीरामाचे अनुयायी भास्कर भगरे हे यापूर्वीच लोकसभेत पोहोचले.त्यामुळे दिंडोरीत शेटे म्हणतील तोच आमदार असे समीकरण गेल्या अनेक खेपेत प्रत्येकाने पाहिले,याही पेक्षा महत्वाचे म्हणजे ज्याच्याकडे शेटेंची नजर त्याची दावेदारी पक्की मानली जाते.तीन वेळेला झिरवाळ यांना कोणतीही नजर लागली नाही परंतु यंदा शरद पवार यांनाच बगल देत विकासाच्या नावेत बसून झिरवाळ यांनी महायुतीच्या नदीत फेरफटका मारला.आता झिरवाळ की चारोस्कर याकडे लक्ष्य लागलेले असताना भास्कर भगरे
यांच्यासाठी जी फौज एकरूप झाली त्यातील खासदार साहेबांचे अनेक उजवे डावे झिरवाळ यांच्यासोबत गेले असून काही जण आपली बाजू आणखी गरम करण्यासाठी आपल्या कॉलरला कडक करून स्वतःला चमकवत आहे. अशामुळे सुरू असलेल्या राजकीय भाऊबंदकीमुळे खुद्द शरद पवारांनाच यानिमित्ताने दिंडोरीत आव्हान उभे राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे आगामी दहा दिवस नेमके कोणकोणते समीकरण उदयास येतात की तालुक्यातील किंगमेकर नेते निष्ठा ठेवत आपापला राजकीय धर्म पाळून ओठात एक पोठात दुसरे अन् अंतर्मनात तिसरे असे काही घडते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दिंडोरीत रात्र वैऱ्याची नसून आपल्याच नजीकच्या काहींवर मेहेरनजर ठेवण्याची असल्याने
शेटे साहेब जागते रहो..!
किंगमेकर म्हणजे काय?
सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी स्वतःला सिध्द केलेले काही किंगमेकर कार्यकर्त्यांच्या मार्फत आवाका वाढवत आहे. त्यामुळे असे शब्द नजरेस पडताना.पाहू. सुरू असलेल्या राजकीय सुंदोपसुंदीत याचा नेमका ‘अर्थ’ काय लावायचा असा प्रश्न अनेक सर्वसामान्य निष्ठावंतांना पडला आहे.निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असताना त्याच उत्सवाच्या तव्यावर स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्याचे कसब देखील अनेक जण करताना जाणवतात असे दिंडोरीत तरी अनेक ठिकाणी चित्र आहे.त्यामुळे दिंडोरीच्या बाबतीत गड आणि सिंह दोघांना सोबत आणायचे असेल तर श्रीरामाचे अन् आघाडीचे अनुकरण आणि लोकसभा सारखी एकजूट अत्यंत महत्वाची ठरणार आहे..अन्यथा रामकृष्ण हरीची धून केवळ दिल्लीत ऐकू येईल.