दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील जानोरी येथे प्रतिबंधित पानमसाला विक्री करण्यासाठी गाळ्यांमध्ये अवैधपणे जवळपास २० लाख किमंतीचा साठा हस्तगत झाल्याने पुन्हा एकदा जानोरी येथील औद्योगिक वसाहातीत सुरु असणार्या अवैध धंद्याची चर्चा झाली. जानोरी ग्रामपंचायतीने निर्दशनास आणून दिल्याने दिंडोरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
नव्याने नियुक्त झालेले पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यावर विशेष लक्ष दिले आहे. अवैध धंदे समुळ नष्ट करण्यासाठी पोलिस यंत्रणा कार्यान्वित केले आहे. मागील काही दिवसांपुर्वी जानोरी औद्योगिक वसाहतीत जवळपास १ कोटी किमंतीच्या अवैध डिझेल सदृश्य साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई केली होती. जानोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरु असलेल्या या अवैध धंद्याविषयी जानोरी ग्रामपंचायत अनभिज्ञ होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्याकडून कोणत्या व्यवसायासाठी परवानगी घेतली व प्रत्यक्षात तेथे कोणता व्यवसाय चालतो, याविषयी खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष भेट देवून शहानिशा करण्यासाठी मोहिम आखली. गुरुवारी औद्यागिक वसाहातीत सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य विलास काठे आदींसह कर्मचारी गेले असता जानोरी – दहावा मैल रोडलगत मिळकत नं. १२८९ च्या आशापुरा गोडाऊनमधील गाळा नं. ३० मध्ये तंबाखुजन्य अवैध साठा असल्याचे निदर्शनास आले. या साठ्याबाबत विचारणा केली असता गाळ्यातील दोन कामगारांनी तेथून पळ काढला. यात काहीतरी चुकीचा प्रकार होत असल्याचे संशय आल्याने उपसरपंच हर्षल काठे यांनी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे यांना दूरध्वनीव्दारे कळविले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोंलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, धुमाळ, कावळे आदी पोलिस कर्मचारी तत्काळ दाखल झाले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे गिरीष बागुल, किशोर खराटे, बापू पारखे, दिपक आहिरे आदींनीही भेट दिली. यावेळी संबंधित गाळा मालकाला बोलावून माणिकचंद मीनीचे ४६०० पॅकेज, गोवा १००० चे ४५५ पॅकेज, माणिकचंद पानमसाल्याचे १००० पॅकेज, एमसी सुंगधी तंबाखू १०४० पॅकेज असे एकुण १९ लाख ४६ हजार ४०० रुपयें किमंतीचा साठा जप्त केला. मानवी आरोग्यास घातक असलेल्या त्यास विक्रीस अथवा साठा करण्यास प्रतिबंध असतांनाही शासकीय आदेशाची अवलेना करत प्रतिबंधित पानमसाला गाळ्यामध्ये विक्री करण्यासाठी साठा करतांना मिळून आला. या प्रकराणात शनी हनुमान गुप्ता (रा.व्हिलेज कयामुद्दीनपुर, पो. छापर सुलतानापूर, उत्तरप्रदेश) तसेच प्रदिप शर्मा, रा. मुंबई या आरोपींवर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोंलिस उपनिरीक्षक पांडूरंग कावळे, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, धुमाळ, कावळे आदी पोलिस कर्मचारी करीत आहे.