दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील नगरपंचायतच्या काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केल्याची माहिती जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी दिली आहे.
दिंडोरी नगरपंचायतचे काही शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिंडोरी येथील नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिंडोरी नगरपंचायतचे शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांसह भेट घेत सर्व नगरसेवकांचा पक्ष प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. दिंडोरीच्या नगराध्यक्षा सौ.मेघा नितिन धिंदळे, गटनेते प्रदिप श्रीकांत घोरपडे, बांधकाम सभापती सुजित त्रंबक मुरकटे, महिला व बालकल्याण सभापती
सौ.सुनिता रमेश लहांगे, सौ.ज्योती सचिन देशमुख, सौ.कल्पना संतोष गांगोडे तसेच काँग्रेसचे नगरसेवक गणेश शांताराम बोरस्ते, सौ.शैलाताई सुनिल उफाडे यांनी प्रवेश केल्याचे तांबडे यांनी सांगितले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, उपनेत्या तथा प्रवक्त्या सौ.शितलताई म्हात्रे, सचिव संजय मशिलकर, संपर्कप्रमुख जयंत साठे हे उपस्थित होते. या घडामोडीने दिंडोरी नगरपंचायत वर बाळासाहेबांचे शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.