दिंडोरी – तालुक्याच्या पश्चिम भागातील ओझे, करंजवण, म्हेळुस्के परिसरात मान्सूनपुर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या घराचे पत्रे उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वणी जवळील आंबानेर येथील शेतकरी किरण अशोक घुगे यांची दोन एकर द्राक्षबाग वादळी पावसाने भूईसपाट झाली आहे. शुक्रवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास ओझे परिसरात अचानक मोठे वादळ निर्माण होऊन जोरदार वाऱ्यामुळे अनेकाच्या घराचे पत्रे अर्धा किलोमीटर पर्यंत जाऊन पडले आहे. तर विजेचे पोल पडल्यामुळे या परिसतील विजेचा पुरवठा रात्रीपासून बंद आहे. त्याप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडाल्यामुळे अनेकाचे कांदे पण थोड्या फार प्रमाणात ओले झाल्यामुळे नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे. या नुकसानीची पाहणी ओझे येथे ग्रामसेवक धीरज भांबरे, सरपंच आनंदा धुळे, उपसरपंच विमलताई बर्डे यांनी केली.