विस्तारीकरण, सी.एन.जी.डेअरी प्रकल्प करण्याचे श्रीराम शेटे यांचे सूतोवाच
दिंडोरी- कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदी पुनश्च तिसऱ्यांदा श्रीराम शेटे यांची तर व्हा.चेअरमन पदी शिवाजीराव बस्ते यांची बिनविरोध निवड झाली. कादवा सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक होवून चेअरमन श्रीराम शेटे यांचे नेतृत्वाखालील कादवा विकास पॅनलने सर्व जागा जिंकत सत्ता कायम राखली होती.कारखाना सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी.पुरी यांचे मार्गदर्शनाखाली,जिल्हा निबंधक किरण गायकवाड यांचे उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.चेअरमन पदासाठी श्रीराम शेटे तर व्हा.चेअरमन पदी शिवाजीराव बस्ते यांचे एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली कारखान्याचे संस्थापक कर्मवीर रा.स.वाघ यांचे पुतळ्यास पुष्पहार घालत अभिवादन करण्यात आले. यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचा कादवा विकास पॅनल समिती ,कादवा कामगार युनियन व विविध मान्यवरांचे वतीने सत्कार करण्यात आला.या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद बाकेराव जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुजरातचे सायन शुगरचे चेअरमन राकेश भाई पटेल यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीराम शेटे यांनी सांगितले की, विरोधकांनी निवडणूक प्रचारात अपप्रचार करून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सभासद बांधवांनी संचालक मंडळाने गेली चौदा वर्ष जे प्रामाणिक काम करत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढत कारखान्याचे विस्तारीकरण केले.सातत्याने उसाला सर्वाधिक भाव दिला इथेनॉल प्रकल्प हाती घेत कादवाचा विकास केला. या चांगल्या कामाची पावती म्हणून पुन्हा सत्ता दिली असून आमचेवरील जबाबदारी वाढली आहे. कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड वाढत असून वेळेत ऊस तुटावे यासाठी तातडीने विस्तारीकरण करत गाळप ४००० मेटनापर्यंत वाढविण्यात येईल तसेच सी एन जी प्रकल्प व डेअरी प्रकल्प उभा करत शेतकरी सभासदांचे हित साधले जाईल असे श्रीराम शेटे यांनी सांगितले.
पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी सभासद ऊस उत्पादकांनी गुजरात पॅटर्न प्रमाणे कारखान्याकडे जास्तीत जास्त ठेवी ठेवाव्या परिणामी कारखान्यास कर्ज घ्यावे लागणार नाही ठेवीदारांना ठेवीवर व्याज मिळेल व उसाला एफ.आर.पी. पेक्षा जादा भाव देणे शक्य होईल असे सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सायन शुगर गुजरात चे राकेशभाई पटेल यांनी कादवा चे विकासात्मक वाटचालीचा गौरव करत श्रीराम शेटे यांचे नेतृत्व सहकारी साखर उद्योगास आदर्शवत असल्याचे सांगितले . यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, बोपेगाव चे सरपंच वसंतराव कावळे,विठ्ठल संधान यांची भाषणे झाली. यावेळी सर्व संचालक, सभासद,कारखान्याचे कार्यकारी संचालक हेमंत माने,सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले तर आभार शाम हिरे यांनी मानले.
विस्तारीकरण,सी.एन.जी. व डेअरी प्रकल्प प्रस्तावित.
कादवाने १२५० गाळप क्षमता दुप्पट २५०० केली असून कार्यक्षेत्रात झपाट्याने ऊस लागवड वाढत आहे.वेळेत ऊस तोड व्हावी यासाठी कमी दिवसात जास्त गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी तातडीने विस्तारीकरण करत ४००० मेटन पर्यंत गाळप क्षमता करण्यात येईल.तसेच सी एन जी प्रकल्प प्रस्तावित असून पूर्ण अभ्यासंती हा प्रकल्प हाती घेतला जाईल तसेच ऊस क्षेत्र वाढत शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाची जोड मिळावी यासाठी डेअरी प्रकल्प सुरू करण्याचा मानस असल्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले असून इथेनॉल प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. तरी सर्व सभासद ऊस उत्पादक यांनी सहकार्य करावे जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.