दिंडोरी – दिंडोरी पंचायत समितीच्या कारभार्यांचा कार्यकाळ संपल्याने अखेर दिंडोरी पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती झाली असून गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार हे प्रशासकपदी विराजमान झाले आहे. १४ मार्च २०१७ रोजी पंचायत समितीवर सभापती निवड झाली होती. त्याला सोमवार १४ मार्च २०२२ रोजी पाच वर्ष पूर्ण झाली. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असल्याने दिंडोरी पंचायत समितीवर आजपासून प्रशासक राज सुरु झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांची नियुक्ती केली आहे. दिंडोरी पंचायत समितीच्या पदाधिकार्यांच्या कार्यालयातील फलक काढण्यात आले असून आजपासून गटविकास अधिकारी भावसार हेच कामकाज पाहणार आहे. निवडणूक सहा महिने लांबल्याने सर्व इच्छुकांच्या आशा हिरमोड झाल्या आहे. सध्या सर्व इच्छुकांनी शांतता घेतली असून निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर पुन्हा इच्छुकांची भाऊगर्दी वाढेल, यात शंका नाही.
पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांची नियुक्ती होताच मावळते सभापती कामिनी चारोस्कर, माजी उपसभापती वसंत थेटे, कैलास पाटील, एकनाथ खराटे, संगीता घिसाडे आदींसह सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशासक म्हणून कामकाज बघताना सर्व सामान्य जनतेच्या कामांना कोणतीही अडचण येवू नये, अशी अपेक्षा सर्व सदस्यांनी व्यक्त केली. त्यावर प्रशासक म्हणून पंचायत समितीवर नेमणूक झाली असली तरी सर्व सामान्यांच्या कामांना अडचणी येणार नाही, याची शाश्वती चंद्रकांत भावसार यांनी दिली. तसेच दिंडोरी पंचायत समितीच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगातील नियोजित कामांना खिळ बसणार नाही. जी कामे सदस्यांनी नियोजित केले आहे, ती कामे लवकरच पुर्ण होतील अशी ग्वाहीही नवनियुक्त प्रशासक चंद्रकांत भावसार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. तसेच दिंडोरी पंचायत समितीच्या कारभार्यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करत पुढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहन नवनियुक्त प्रशासक चंद्रकांत भावसार यांनी केले.