दिंडोरी – दिंडोरी येथील सैन्य दलातील जवान प्रसाद कैलास क्षीरसागर (वय २४) यांचे अरुणाचल प्रदेश मध्ये देशाचे संरक्षणार्थ सेवा बजावत असताना सोमवारी अपघाती वीरमरण आले. त्यास आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देऊन शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार, चीफ ऑफ स्टापचे कर्नल शशिकांत शर्मा, २२२ शिल्ड रेजिमेंटचे मेजर राऊल मेटा,स्टेशन कमांडर सुभेदार राजेश, प्रभारी प्रांत अधिकारी निसाळ, तहसीलदार पंकज पवार, माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड,पोलीस निरीक्षक, प्रमोद वाघ, नगराध्यक्ष मेघा धिंदळे, उपनगराध्यक्ष अविनाश जाधव , मुख्याधिकारी नागेश येवले,माजी सैनिक संघटनेचे विविध तालुका अध्यक्ष , लोकप्रतिनिधी आदिनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी लष्करी विभाग व पोलीस दलाने मानवंदना देत आकाशात फायर करत सलामी दिली.
विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी बोलतांना सांगितले की वीर जवान प्रसाद क्षिरसागर यांनी देशसेवेसाठी केलेले कार्य तरुणांसाठी आदर्श असून या कुटुंबाला शासनाच्या वतीने जे सहकार्य लागेल ते देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अंत्यत गरीब कुटुंबातील जवान प्रसाद यास अपघाती वीरमरण आल्याने कुटंबासाठी नक्कीच मदत करण्याची ग्वाही देत श्रद्धाजली अर्पण करण्यात आली.
२२२ शिल्ड रेजिमेंटचे प्रमुख मेजर राहुल मेटा यांनी बोलतांना सांगितले की प्रसाद यांनी इतर वीरजवानाचे प्राण वाचविले असून ती देशासाठी अभिमानाची बाब आहे. सकाळी ७ वाजता वीर जवान प्रसाद यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. यावेळी त्यांची आई भाऊ वडील मित्रपरिवार नातेवाईकांनी आक्रोश केला. या ठिकाणी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा उमराळे रोड मार्गे, सोसायटी जवळून, मोठा वाडा, मारुती चौक, पालखेड चौफुली मार्गे अंतिम संस्कार ठिकाणी आर्मीच्या सजवलेल्या ट्रक मध्ये नेण्यात आली. यावेळी अमर रहे ! अमर रहे ! विरजवान अमर रहे !, जब तक सूरज चांद रहेगा, तब तक प्रसाद तुम्हारा नाम रहेगा. ! भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा विविध घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता.रांगोळी काढून फुलांचा वर्षाव अंत्ययात्रेवर करण्यात येत होता. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, अग्निपंखअकडमी, अचिव्हार ग्रुप,विविध सामाजिक कार्यकर्ते,नगरपंचायत प्रशासन, स्वयंसेवक आदींनी परिश्रम घेतले.
https://fb.watch/bdTfIafjH9/