दिंडोरी – येथील प्रसाद कैलास क्षीरसागर (वय २४) या सैन्य दलातील जवानास अरुणाचल प्रदेश मध्ये देशाचे संरक्षणार्थ सेवा बजावत असताना सोमवारी अपघाती वीरमरण आले आहे. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिंडोरीत येणार असून शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षिरसागर हे भारतीय सैन्य दलात होते सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. सोमवारी सकाळी सैन्यदलाच्या कॅम्प मधून सैनिकी ट्रक द्वारे आपल्या सहकाऱ्यांसोबत सेवेच्या ठिकाणी जात असताना ट्रक दरीत कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत सोमवारी सायंकाळी त्याचे मित्रांना सदर बातमी समजली मात्र त्यास अधिकृत पुष्टी मिळाली नाही. तालुका प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून सदर घटनेची माहिती घेतली. दुपारी लष्करी अधिकारी यांनी दिंडोरी येथे तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेत अंत्यसंस्कार तयारीचा आढावा घेतला असून गुरुवारी सकाळ पर्यंत त्यांचे पार्थिव दिंडोरी शहरात येणार असून त्यानंतर शासकीय इतमात सिडफार्म जागेत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचे पश्चात आई वडील बहीण व भाऊ असा परिवार असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांचेवर होती.जानेवारीत ते सुट्टीवर आलेले होते.सुट्टी संपून ३० जानेवारीला ते दिंडोरीतून अरुणाचल प्रदेश मध्ये आपल्या सेवेसाठी रुजू होण्यासाठी रवाना झाले होते.