दिंडोरी – दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने राज्याचा महाविकास आघाडी पॅटर्न दिंडोरीत दिसला. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मेघा धिंदळे तर उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा झाली.
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या मेघा धिंदळे व भाजपच्या आशा कराटे यांच्यात लढत होत धिंदळे यांना १३ तर भाजपच्या आशा कराटे यांना ४ मते मिळत धिंदळे विजयी झाल्या. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजप नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी भाजपा गटाच्या वतीने सौ.धिंदले व अविनाश जाधव यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष निवडीला भाजप नगरसेवकांनी सभागृह त्याग केला होता.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात दाखल झाले होते. नगराध्यक्ष मेघा धिंदळे यांनी दिंडोरीचे सुपुत्र जवान प्रसाद क्षीरसागर यांना वीरमरण आल्याने त्यांचे श्रद्धांजलीची सूचना मांडली व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सत्कार केला. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा सत्कार केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. वीर जवान क्षीरसागर यांच्या दुःखद घटनेमुळे कोणताही जल्लोष करण्यात आला नाही. यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, माधव साळुंखे, शिवसेना तालुकप्रमुख पांडुरंग गणोरे,माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख,शहरप्रमुख संतोष मुरकुटे,रमेश बोरस्ते,विठ्ठल अपसुंदे,नितीन धिंदळे,गुलाब जाधव आदी सह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी एकत्र येत महाविकास आघाडी करत सत्ता मिळवून प्रतिष्ठा कायम राखली आहे.