दिंडोरी : शहरात ४५ खाटांचे कोविड सेंटर अखेरीस सुरु करण्याचा निर्णय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत घेण्यात आला असून मोहाडी येथील सह्याद्री कंपनीवरही कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.
दिंडोरी पंचायत समितीच्या सभागृहात विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत तालुक्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, दिंडोरीचे पोलिस निरीक्षक अनंत तारंगे, वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजपूत, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ. विलास पाटील यांनी तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा दिला.
सामान्य जनता आणि गाव पुढारी नियम पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात आले. गाव पातळीवर काम करीत असलेले ग्रामसेवकांच्या कामकाजाबाबत बैठकीत ताशेरे ओढण्यात आले. ग्रामसेवकांनी चांगले काम केल्यास प्रत्येक गाव कोरोना मुक्त होवू शकतो अशी सूचना विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ व माजी आमदार धनराज महाले यांनी केली.
दिंडोरी शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता दिंडोरी शहरात गांधीनगर टेकडीवर असलेल्या वसतीगृहात ऑक्ससिजन बेडसह ४५ खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्याची तसेच मोहाडी येथे सह्याद्री कंपनीत २० खाटांचे कोविंड रुग्णालय सुरु करण्याची घोषणा विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केली. यावेळी माजी आमदार धनराज महाले, माजी जि. प. सदस्य प्रवीण जाधव, जि. प. सदस्य भास्कर भगरे, पत्रकार नितीन गांगुर्डे, डॉ. योगेश गोसावी, डॉ. वाघेरे आदींनी सूचना मांडल्या. बैठकीस नायब तहसीलदार बावीस्कर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष ढोकरे, प्राचार्य विलास देशमुख, मनोज शर्मा, विलास कड, शाम हिरे, कैलास मवाळ, अविनाश जाधव, माधव सांळूखे, राजेंद्र उफाडे, प्रितम देशमुख,रणजित देशमुख नितीन भालेराव,गंगाधर निखाडे,अमोल देशमुख आदीसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. ,
विलगिकरण कक्षासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
दिंडोरी तालुक्यात गावोगाव कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून तो रोखण्यासाठी अनेक गावातील ग्रामस्थांनी गावातील शाळांमध्ये विलीगिकरन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दिंडोरी येथे माजी सरपंच प्रितम देशमुख,डॉ विलास देशमुख यांनी बालभारती विद्यालयाची इमारत विलीगिकरन कक्षास देण्याचे जाहीर करत अँटिजेंन किट उपलब्ध करून घ्यावे. इतर व्यवस्था करण्याचे सूतोवाच केले आहे. इशानेश्वर स्कुलचे संचालक नितीन गांगुर्डे यांनी त्याचे शाळेची इमारत आवश्यक असल्यास प्रशासनास देण्याचे सांगितले आहे.डॉ योगेश थिगळें यांनी त्याचे रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देऊ प्रशासनाने ऑक्सिजन व रेमिडीसीवर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शहरातील सर्व खाजगी डॉक्टर प्रशासनास सहकार्य करतील असे सांगितले. सोंनजांब येथे ग्रामस्थांनी येथील मंगल कार्यालयात विलीगिकरन कक्ष सुरू करण्याची तयारी केली आहे.
ग्रामीण भागात ऑक्सिजन रेमडेसिवीर अँटिजेन टेस्ट किट पुरविण्याच्या सूचना
विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक येथे जिल्हाधिकारी,आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक,अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांची भेट घेत जिल्ह्यातील कोरोना प्रार्दुभाव व उपाययोजनांची माहिती घेतली .दिंडोरी पेठ तालुक्यासह ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असून रेमडेसिवीर ग्रामीण भागातील हॉस्पिटलला पुरवठा झाला नसल्याची तक्रार आहे. तरी सदर ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा ग्रामीण भागात त्वरित पुरवठा करावा,जादा लसीच्या मात्रा द्याव्या,जास्तीत जास्त अँटिजेंन किट उपलब्ध करून द्यावे असे सांगितले तसेच गावोगाव विलगिकरण कक्ष स्थापन करावे तलाठी ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी पोलीस पाटील यांनी गावपातळीवर योग्य नियोजन करत कोरोनाचा प्रादुरर्भाव रोखावा असे सांगितले.