जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विविध मागण्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
दिंडोरी : कोविड ड्युटीवर असलेल्या व कोविड महामारीशी सामना करताना मृत्यू झालेल्या डीसीपीएस /एनपीएस धारक शिक्षकांच्या वारसांना पन्नास लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी नाशिक जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन वडजे , सरचिटणीस गोरख देवढे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषद येथे शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता शासनाकडे प्रलंबित असून तो डीसीपीएस धारक शिक्षकांना तात्काळ रोखीने देण्यात यावा. तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जमा रकमेचा परतावा व सानुग्रह अनुदान वेळेत देण्यात यावे, वैद्यकीय बिले चटोपाध्याय प्रस्ताव, स्थायित्व प्रस्ताव वेळेत मार्गी लावावेत, डी सी पी एस योजनेच्या हिशोब स्लिपांमध्ये चुका झालेल्या असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी, डीसीपीएस योजनेतील प्रलंबित शासन हिस्सा व व्याज तात्काळ मागणी करण्यात यावी, मयत शिक्षकांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वाने नोकरीत सामावून घ्यावे या व अशा इतर मागण्यांचा समावेश निवेदनात असून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिले.
यावेळी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते प्रदीप पेखळे, प्रसिद्धी प्रमुख किरण शिंदे, मुख्य संघटक माणिकराव घुमरे, आश्रम शाळा विभाग प्रमुख निशाल विधाते, पेठ तालुका अध्यक्ष अनिल सांगळे, निफाड तालुका अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, दिंडोरी तालुका अध्यक्ष दिगंबर बादाड, कल्याण कुडके, विलास पेलमहाले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
…..