दिंडोरी – नगरपंचायत निवडणूकीसाठी नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षण जागांमध्ये फेरबदल झाला आहे. त्यामुळे झालेल्या सुधारित आरक्षण सोडतीत नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. आता त्या सर्वसाधारण झाल्या आहेत. दिंडोरी नगरपंचायतीचे सुधारित आरक्षण प्रांतअधिकारी डॉ. संदीप आहेर यांचे उपस्थितीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी सोडत प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी अनुसूचित जाती साठीच्या दोन व अनुसूचित जमातीचे चार जागा आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत राहत शासकीय आदेशान्वये उर्वरित 11 जागांमधून 2 ओबीसी जागा चिठ्ठी द्वारे आरक्षित करण्यात आल्या. त्यात 2015 ला ज्या जागा ओबीसीसाठी राखीव होत्या त्या वगळून इतर जागांमधून एक ओबीसी व एक ओबीसी महिला राखीव करण्यात आली. उर्वरित 9 सर्वसाधारण जागांमधून 5 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. त्यात एक महिला जागेसाठी चिठ्ठी काढण्यात आली.
यश गायकवाड या बालकाचे हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात गेल्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण असलेला प्रभाग 6 सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला. या सुधारित आरक्षणामुळे फारसा बदल झालेला नसला तरी प्रभाग सहा महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथील इच्छुक पुरुष उमेदवारांची अडचण झाली आहे. त्यांना आता कुटुंबातील महिलेला निवडणुकीत उतरवावे लागणार आहे. सोडत काढण्यावेळी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक ,ग्रामस्थ,नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते.
दिंडोरी नगरपंचायत आरक्षण खालीलप्रमाणे
सर्वसाधारण (प्रभाग क्र.2,5,14,17,)
सर्वसाधारण महिला (प्रभाग क्र.1,6,7,8,13)
अनुसूचित जमाती (प्रभाग 4,12)
अनुसूचित जमाती महिला (प्रभाग 3,9)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (प्रभाग 11)
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (प्रभाग 16)
अनुसूचित जाती (प्रभाग 10)
अनुसूचित जाती महिला (प्रभाग 15)