दिंडोरी – तालुक्यातील मातेरेवाडी वरखेडा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला. चिखली नाल्याला मोठा पूर येत मातेरेवाडी येथे सदर पुराचे पाणी गावातील काही घरांमध्ये घुसले. त्यात अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
मातेरेवाडी-वरखेडा परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाट व वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही वेळात सर्वत्र पाणीच पाणी झाले. मातेरेवाडी गावच्या उत्तर व पश्चिमेला सर्व परिसरातील नाल्यांना तसेच वरखेडाकडून येणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पाऊस सुरूच असल्याने पुराच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होत सदर पाणी खंडेराव मंदिर परिसर व शेजारील आदिवासी वस्तीत घुसले.
अचानक अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ झाली. अनेक रहिवाशांचे घरातील धान्य, संसारपयोगी साहित्य व जीवनावश्यक सामान पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच राजाराम सोनवणे यांनी केली आहे. बोपेगाव परिसरातही ढगफुटी होत सर्वत्र पाणीच पाणी झाले. विविध शेतमाल व द्राक्षबागांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. सरस्वती नाल्याला मोठा पूर आला होता. द्राक्ष पिकांसह भाजीपाला व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गावा परिसरात नक्की किती पाऊस झाला याची अद्याप कुठलीच माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र, ग्रामस्थांच्या मते ही ढगफुटीच होती. बघा गावातील पूरस्थितीचा व्हिडिओ