दिंडोरी – कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील युवकांनी पुढाकार घेत येत्या ३० एप्रिलपर्यंत कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दिंडोरी तालुक्यात शेकडोच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच दिंडोरी शहरासोबतच आजूबाजूच्या सर्व गावांमध्येही जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात येत आहे.
जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व दुध वगळता सर्व प्रकारची दुकाने १०० टक्के बंद असणार आहेत. त्यामुळे कोणीही दुकाने उघडण्याचा प्रयत्न करू नये, त्यावर कारवाई करण्यात येईल. भाजीपाला व रस्त्यावरील दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.याबाबत जनतेने हा निर्णय घेतला असल्याने प्रशासकीय यंत्रणाही यास सहकार्य करणार आहे. जनतेनेही विनाकारण घराबाहेर पडू नये आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जनतेच्या वतीने करण्यात आले आहे.
बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दिंडोरी शहर व परिसरातील गावांनी जनता कर्फ्यूचा चांगला असा निर्णय घेतला असून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येते की कोणीही मेडिकल व्यतिरिक्त बाहेर फिरू नये.विनाकारण फिरणारे , मास्क न वापरणारे आस्थापना खुली ठेवणारे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांनी सांगितले आहे.
जनता कर्फ्यूचा निर्णय चांगला पण
कोरोनाची साखळी रोखण्यासाठी दिंडोरी, वणी, शहर, तसेच दिंडोरी व पेठ तालुक्यातील मोठी व छोटी गावे स्वतः पुढे येत जनता कर्फ्यूचा निर्णय घेत आहे.चांगला निर्णय असून मेडिकल ,दूध वगळता सर्व दुकाने बंद होत असतील तर चांगली गोष्ट आहे.फक्त यामुळे अत्यंत तळागाळातील गरीब नागरिक उपाशी राहता कामा नये.यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अशा लोकांना फूड पाकिटे देऊन त्यांची भूक भागवावी. तसेच जनतेने सर्व नियमांचे पालन करावे व ४५ वयोगतील व पुढच्या नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर यांनी केले आहे.