दिंडोरी, वणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोलेट गेमच्या अमिषात रक्कम गमावलेल्या तरुणाकडून तब्बल ७५ लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर रामचन्द्र वसाळ (वय 30, धंदा- व्यापार, रा. साई संपर्क रो हाऊस शेजारी, शिवाजीनगर, दिंडोरी) या युवकाला आॕनलाईन रोलेट गेम मधून भरपूर पैसा कमविण्याचे आमिष दाखविनण्यात आले. त्याद्वारे वसाळ यांना आॕनलाईन गेम खेळण्यास भाग पाडले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर वसाळ यांनी गेम खेळण्याचे थांबविले. हरलेले पैसे परत मिळतील तू पुन्हा खेळ, असे म्हणून त्याला पुन्हा खेळण्यास भाग पाडण्यात आले. अखेर वसाळ यांनी पुन्हा उधारीवर गेम खेळण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा खेळणे थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमकी देण्यात आली. कैलास शहा, कुमार त्र्यंबक जाधव (वय 45, रा. ओझर मिग, सायखेडा रोड, ता. निफाड) आणि मुद्दत सर अकिल शेख (वय 36, रा. अत्तार गल्ली,ओझर मिग, ता. निफाड), सचिन रमेश बागुल (वय 40, रा. महाराणा प्रताप चौक, ओझर मिग, ता. निफाड) यांनी फसविल्याची तक्रार वसाळ यांनी दिली. त्यांच्या विरोधात दिंडोरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील ३ संशयितांना पोलिसांनी गजाआड केले आहे. तर कैलास शहा याचा शोध सुरू आहे.