नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी तालुक्याच्या ढकांबे येथील दरोडाप्रकरणात पोलिसांनी सात पौकी चार दरोडेखोरांना अटक करुन त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ढकांबे येथील शेतकरी रतन बोडके यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास या दरोडेखोरांनी कुत्र्याला गुंगीचे औषध पाजून बंगल्यात प्रवेश करुन बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा १७ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता.
या दरोड्यातील रेहमान फजल शेख, इरशाद नईम शेख, लखन लाल कुंडलिया, रवि उर्फ लालू, देवीलाल फुलेरी, इकबाल खान फारुन खान, भुरा उर्फ पवन स्तन फुलेरी या सर्वांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून दरोड्याच्या गुन्ह्यात चोरुन नेलेल्या दागिन्यांपैकी १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा जवळपास ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरोड्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तीन वेगवेगळी तपास पथके तयार केली. त्यानंतर नाशिक शहरातील संशयित नौशाद आलम शेख याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याने नाशिक शहर आणि मध्य प्रदेश राज्यातील साथीदारांसह कार आणि दुचाकीवर जाऊन दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली.