दिंडोरी– नाशिक – कळवण रस्त्यावर दिंडोरी नजीक वलखेडफाट्यावर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चालत्या आर्टिगा वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात अलंगुन ता सुरगाणा येथील तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबतचे वृत्त असे की आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वणी कडून नाशिककडे जाणाऱ्या एम एच १५ एफएन ०९९७ या सफेद रंगाच्या मारुती आर्टिगा या गाडीवर वलखेड फाट्यावर फॉर्च्यून कंपनी जवळ वाळलेले झाड अचानक गाडीवर कोसळून झालेल्या अपघातात गाडीच्या मागील सीटवर बसलेले तीन शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय ५१) राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग दिंडोरी रोड नाशिक रामजी देवराम भोये (वय ४९) नाशिक, नितीन सोमा तायडे (वय ३२) रा. रासबिहारी लिंक रोड नाशिक हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. गाडीवरील पुढील इसमांना किरकोळ जखमा झाल्या वरील तीनही शिक्षक सुरगाणा येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय अलंगुन येथील असल्याचे समजते पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण दिंडोरी पोलीस करीत आहे.