नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक- वणी रोडवर झालेल्या भीषण अपघातात ७ जण ठार झाले. दिंडोरी रस्त्यावरील शिवनेरी हॉटेल व संस्कृती लॅान्सच्या समोर ही घटना घडली. या अपघातात तीन महिला तीन पुरुष व लहान बालकांचा मृतांमध्ये समावेश असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. अल्टो गाडी व मोटरसायकलच्या धडकेत ही घटना घडली. या अपघातात अल्टो क्रमांक एमएच ०४ डीवाय ६६४२रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेला नालीमध्ये पलटी झाली होती. अपघातामधील मृत हे दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील असल्याचे समजते. मध्यरात्री हा अपघात झाला.
या अपघातात देविदास पंडित गांगुर्डे (२८), मनीषा देविदास गांगुर्डे (२३), उत्तम एकनाथ जाधव (४२), अल्का उत्तम जाधव (३८), दत्तात्रेय नामदेव वाघमारे (४५), अनुसया दत्तात्रय वाघमारे (४०), भावेश देविदास गांगुर्डे (२) मयत झाले आहेत. तर दोन जण जखमी आहेत
या अपघातातील जखमींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची माहितीची नोंद करण्यात आली आहे.