विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून कुणाचा समावेश होतो, याची उत्सुकता अनेकांना आहे. त्यात जवळपास दोन नावांची निश्चिती झाली होती. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. पण, आता दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे डॅा. भारती पवार व डॅा. भागवत कराड यांचे नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. या चारही खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
या चौघांनाही दिल्लीवरुन बोलावणे आले आहे. त्यामुळे हे सर्व तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सायंकाळी शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संभाव्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या गाठीभेटींनाही आज दिवसभर विशेष महत्त्व राहणार आहे. राज्यातील या चार खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कोणाचे मंत्रीपद जाते हा महत्त्वाचा विषय आहे.
या नव्या मंत्रिमंडळात ओबीसीचे २७, एसी १२ , एसटी ८, अल्पसंख्याक ५ , महिला ११ असणार आहे. त्याचप्रमाणे या मंत्रिमंडळात वकील १३, डॅाक्टर ६, इजिनिअर ५, ब्यूरोक्रेट ७ असणार असल्याचे बोलले जात आहे.