दिंडोरी : तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोविडचा प्रादुर्भाव वाढत असुन रुग्णालयात देखील जागा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची चिंता वाढलीआहे. ग्रामीण भागात देखील आता कोविडमुळे सर्वांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. घरीच कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत असेल किंवा लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीने कुटुंबापासुन वेगळे राहणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांकडे मुबलक खोल्या किंवा टॉयलेट बाथरुम नसतात. त्यामुळे त्या रुग्णांना कुटुंबापासुन वेगळे ठेवणे शक्य होत नाही. अशी अनेक कुटुंबाची परिस्थिती असून या सर्व अडचणींवर उपाय म्हणुन गावातच विलीगीकरण कक्ष चालु करण्याच्या हालचाली दिसुन येत आहेत. तिसगाव ग्राम पंचायत कडून देखील ग्रामस्थांसाठी जनता विद्यालयात उद्यापासुन विलीगिकरण कक्ष सुरु होणार आहे.
तसेच सोनजांब येथील ग्रामस्थांनी कोरोना सोबतची लढाई संपुर्ण गाव मिळुन लढणार असल्याची योजना आखली आहे. गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत गावात मंगल कार्यालयात कोविड सेंटरच उभे केले आहे.आज या कोविड सेंटरचे उद्घाटन जि. प.सदस्य भास्कर भगरे सर,डॉक्टर सावंत,सोनजांबचे ग्रामस्थ यांच्या उपस्थित झाले आहे. गावातील सप्तशृंगी लॉन्स मध्ये कोविड सेंटर सुरु आहे. यासाठी येणारा खर्च गावातुन वर्गणी काढत काही वेळातच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत एक लाखापेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. अजुनही मदतीचा ओघ सुरुच आहे. सोनजांब येथील रुग्णांना गावातच विलीगिकरण कक्ष करुन डॉक्टर देखील नेमण्यात येतील यासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजनांची तयारी करुनच आम्ही कोविड सेंटर उभे करत असून गावकऱ्यांना गावातच कोविडवर उपचार होणार असल्याने बेड साठी होणारी धावाधाव आदी अनेक समस्यांवर तोडगा निघेल असा विश्वास सोनजांब ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सर्वच ग्राम पंचायत कडून गावात विलिगीकरण कक्ष उभारावेत यासाठी गावातील शाळा किंवा योग्य असेल त्या खोल्या ताब्यात घेवुन तिथे कोविड सेंटर उभे करावे व त्यासाठी येणारा खर्च हा 15 वित्त आयोगातुन खर्च करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तिसगाव ग्रामपंचायतच्या ग्रा. प सदस्य अश्विनी नितीन भालेराव यांनी ग्राम विकासमंत्री यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे.