दिंडोरी – राज्य निवडणूक आयोगातर्फे मुदत संपलेल्या राज्यातील ८६ नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या सदस्यपदासाठी असणाऱ्या नागरीकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला जागांसाठी तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला जागांसाठी सुधारित आरक्षण सोडत नव्याने काढण्यात येणार आहे. त्यानुसार दिंडोरी नगरपंचायतची सुधारित आरक्षण सोडत होणार आहे.यापूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी पाच जागा राखीव होत्या मात्र आता त्या दोनच जागा राखीव असणार असून सर्वसाधारण जागेत तीनने वाढ होऊन ती संख्या नऊवर जाणार आहे. दिंडोरी नगर पंचायतीचे सुधारित आरक्षण सोडत शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवन शिवाजी नगर दिंडोरी येथे होणार आहे. सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.