मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसात राजकीय व्यक्तींना आणि त्यांच्या कार्यालयातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.
गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील २२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर, अन्य कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना चाचणी केली जात आहे. सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. अद्याप १५ ते १६ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातीलही २२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व जणांना विलगीकरणात ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. भुजबळ हे कालच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी नाशिक कोरोना आढावा यासह अन्य बैठका घेतल्या. तसेच, अनेक जणांनी त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. अन्य कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जात आहे.