नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग 1 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करणार असून देशभरातील 800 जिल्हे/शहरांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. विभागाने दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी या संदर्भातील कार्यालयीन निवेदन जारी करून मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत.
ही मोहीम निवृत्तीवेतन वितरक बँका, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटना, संरक्षण खात्यांचे महानियंत्रक, दूरसंचार विभाग, रेल्वे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांच्या हितासाठी आयोजित केली जाईल.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 2.0 नोव्हेंबर 2023 मध्ये देशभरातील 100 शहरांमध्ये 597 ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्या अंतर्गत एकूण 1.47 कोटी डिजिटल जीवन प्रमाणपत्रे तयार करण्यात आली, त्यापैकी 45.46 लाख इतके केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारक होते. फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा वापर करून 25.41 लाख डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यात आली आणि 90 वर्षांवरील 30,500 पेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारकांनी त्याचा लाभ घेतला.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपल्या 1.8 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या विशाल नेटवर्कद्वारे 785 जिल्ह्यांमध्ये शिबिरे आयोजित करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक अगदी घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्र वितरित करते. निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन खाती वेगवेगळ्या बँकेत असली तरीही ही सुविधा देशभरातील सर्व श्रेणीतील निवृत्तीवेतनधारकांना लागू होईल. इंडिया पोस्ट पेमेंट बँके द्वारे “डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी घरोघरी सेवा” या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना ippbonline.com वर तपशीलवार माहिती मिळू शकेल. डिजिटल जीवन प्रमाणपत्र निर्मितीसाठी वापरले जाणारे फिंगर बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्र अंतर्भूत असणारे मोबाईल फोन सर्व पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांना देण्यात आले आहेत.निवृत्ती वेतन वितरण करणाऱ्या19 बँका, 150 शहरांमध्ये 750 हून अधिक ठिकाणी शिबिरे आयोजित करतील. वृद्ध/अपंग/आजारी निवृत्तीवेतनधारकांच्या घरी/रुग्णालयांत जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या जातील, जेणेकरून त्यांन हयात असल्याचे प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर करणे सुलभ जाईल. या उपक्रमाचा उद्देश सर्व निवृत्तीवेतनधारकांना अशा मोहिमेचा लाभ मिळावा हा आहे तसेच विशेष करून अधिक वयोवृद्ध गटातील वरिष्ठ निवृत्तीवेतनधारकांसाठी हा उपक्रम अधिक उपयुक्त आहे.
आयपीपीबी आणि निवृत्ती वेतन वितरण करणाऱ्या बँकांनी आयोजित केलेल्या या मोहिमेत डीओपीपीडब्ल्यूकडे नोंदणीकृत असलेल्या, 57 निवृत्ती वेतन कल्याणकारी संस्था, निवृत्तीवेतनधारकांना एकत्रित करून ही शिबिरे आयोजित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
यंदाच्या वर्षी चेहऱ्यावरून ओळख पटविण्याच्या (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर भर दिला जाईल. या मोहिमेसाठी MeitY आणि UIDAI संपूर्ण तांत्रिक सहाय्य प्रदान करतील. वृद्ध निवृत्तीवेतन धारकांसाठी फेस ऑथ अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यात आले आहे.
दूरदर्शन(DD),आकाशवाणी(AIR),आणि पत्र सूचना कार्यालय (PIB) या मोहिमेला श्राव्य, दृक्श्राव्य आणि छापील प्रसिद्धी देऊन पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.या मोहिमेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी एसएमएस, ट्विट (#DLCCampaign3), प्रचारकाव्य आणि लघुपट सादर करत ही मोहीम सर्वदूर पोहोचण्यासाठी अधिक पूरक प्रयत्न केले जातील.