नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आज नवी दिल्ली इथल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून, नवी दिल्ली, वाराणसी आणि बंगळूरू या देशातील तीन विमानतळांसाठी डीजी यात्रा प्रणालीचा शुभारंभ केला. विमानतळांवर चेहरा ओळख तंत्रज्ञानाच्या (FRT) मदतीने प्रवाशांसंदर्भातली संपर्क रहित, अखंड प्रक्रिया ठेवणे, ही डीजी यात्रा प्रणालीमागची संकल्पना आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालया अंतर्गत डिजी यात्रा फाउंडेशनच्या संकल्पनेतून उतरलेल्या डिजी यात्रा प्रकल्पाबाबत बोलताना मंत्री म्हणाले की, विमानतळावरील प्रवासी विविध तपासणी केंद्रांमधून कागद रहित आणि संपर्क विरहित प्रक्रियेद्वारे चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांचा वापर करून आपली ओळख प्रस्थापित करतो आणि ही ओळख प्रवाशाच्या बोर्डिंग पासशी जोडली जाते, अशी या प्रकल्पाची संकल्पना आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड आधारित प्रमाणीकरण आणि स्वतःची प्रतिमा यासह डीजी यात्रा अॅपवर केवळ एकदा नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवाशांची अधिक सोय आणि प्रवासामधील सुलभता, हे या प्रकल्पाचे मोठे फायदे आहेत.
प्रकल्पाच्या गोपनीयतेबाबतच्या वैशिष्ट्यांबद्दल मंत्री म्हणाले की, प्रवाशांची गोपनीयता जपण्यासाठी वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीचे (PII) कोणतेही केंद्रीय संचयन नाही. प्रवाशांचा आयडी (ओळख पत्र) आणि प्रवासाचे तपशील प्रवाशाच्या स्मार्टफोनमध्येच सुरक्षित वॉलेटमध्ये साठवले जाते. अपलोड केलेला डेटा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि वापरा नंतर सर्व डेटा 24 तासांच्या आत सर्व्हरमधून काढून टाकला जाईल.
डिजी यात्रा प्रणालीमुळे भारताचे स्थान आता लंडनमधील हिथ्रो आणि अमेरिकेतील अॅटलांटासारख्या जागतिक दर्जाच्या विमानतळांच्या बरोबरीला येईल.पहिल्या टप्प्यात देशातील ७ विमानतळांवर डिजी यात्रा प्रणाली सुरू होईल. सुरुवातीला दिल्ली, बंगळूरू आणि वाराणसी या ३ विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे, तरी मार्च २०२३ पर्यंत ही प्रणाली हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि विजयवाडा या ४ विमानतळांवर, आणि त्यानंतर देशभरातल्या विविध विमानतळांवर ही प्रणाली सुरु करण्यात येईल. ही सेवा सध्या केवळ देशांतर्गत प्रवाशांसाठीच सुरु करण्यात आली आहे. डिजी यात्रा अॅप आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हीवर उपलब्ध आहे. ते ऐच्छिक आहे. डिजी यात्रेसह, भारत विमानतळांवर अखंड, विनासायास आणि आरोग्य जोखीम मुक्त प्रक्रियेसाठी एक नवीन जागतिक मानक स्थापित करत आहे.