पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशात असो की राज्यात काही गावांमध्ये अनोख्या परंपरा पाळल्या जातात, या परंपरा शेकडे वर्षांपासून सुरू असून त्यानुसार तेथील पुरुष आणि महिला त्यांचे पालन करतात. उत्तर प्रदेशात बरसाना येथे होळीनिमित्त महिला लाट्याकट्यांनी पुरुषांना मारतात, त्याला लठ्ठामार होळी असे म्हणतात. सातारा जिल्ह्यातील एका गावातही अशीच आगळीवेगळी परंपरा म्हणजे शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला ‘बोरीचा बार’ यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी सुखेड व बोरी ( ता. खंडाळा पारगाव, जि. सातारा ) येथील ओढय़ाच्या काठावर पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढय़ावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत अनोखी परंपरा कायम ठेवली.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. दोन गावांतील महिला एकत्र येऊन गावांच्या मधून वाहणाऱ्या ओढय़ाच्या काठावर येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढय़ावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात. खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या दोन गावांमधील महिलांनी वेगवेगळ्या वेळी येऊन बोरीच्या बाराची यंदा परंपरा शिव्या देत सण साजरा करुन कायम ठेवली. मागील वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगामुळे बोरीचा बार रद्द करण्याचा निर्णय दोन्ही गावांनी घेतला असला तरी ही प्रथा बंद होऊन गावात काही अनिष्ट घडून नुकसान होऊ नये म्हणून महिलांनी बोरीचा बार खंडित होणार नाही याची दक्षता घेतली होती.
लोणंद व खंडाळा या दोन्ही गावापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर डोंगर कुशीत असणार्या सुखेड व बोरी गावाच्या दरम्यान जाणार्या ओढ्याच्या पात्रात दोन्ही गावच्या महिला दोन्ही बाजूच्या काठावर उभ्या राहून, हातवारे करून एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार गेली अनेक वर्षे घालत आल्या आहेत. बोरीच्या बाराची प्रथा खंडित झाल्यास गावावर संकट येईल म्हणून गावातीलच माहेर व सासर असणार्या बोरीच्या महिलांनी सनई, डफडे, तुतारीच्या निनादात त्यानंतर सुखेड गावातील महिलांनीही हळदी-कुंकू वाहून व श्रीफळ वाढवून पूजा केली. तेथील माती घेऊन ओढ्यात जाऊन सतीआईची खण, नारळाने ओटी भरून पूजा केली. काही महिलांनी हातवारे करत पण शिव्या देता बार घातला. यावेळी दोन्ही गावातील महिलांनी गावावर कोणतेही संकट येऊ, महिलांचे रक्षण व्हावे, महिला आजारी पडू नयेत म्हणून बार घालण्याची परंपरा सुरु ठेवली असल्याचे सांगितले.
बोरीचा बार सुरू असताना पुरुष मंडळी ओढय़ाच्या मध्यभागी उभे राहून दोन्हीकडील महिलांना एकमेकींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर आज श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढय़ापर्यंत गेल्या. यंदा ओढय़ाला पाणी कमी असल्याने त्यांनी ओढय़ाच्या काठावर उभे राहून पैलतीरावर एकमेकांकडे हातवारे करत महिलांवर शिव्यांचा भडिमार करीत बोरीचा बार साजरा केला. या वेळी लोणंद पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता.
Different Tradition Women Bad Words Village abusing Boricha Bara Satara Nagpanchami