विकास गीते, सिन्नर
तब्बल दीडशे वर्षांची परंपरा असलेली जायवाची धिंड काढण्यात वडांगळीकरांना यंदाही यश आले आहे. तालुक्यातील वडांगळी येथे धुलिवंदन ते रंगपंचमी दरम्यान जावयाचा शोध घेऊन त्याची मनधरणी करून गाढवावरून धिंड काढण्याची अनोखी परंपरा यंदाही जपली. परंपरेसाठी जावई मिळविण्यासाठी वडांगळीकरांनी नामी शक्कल लढविली. त्यात ते यशस्वी झाले आणि ही अनोखी परंपरा संपन्न झाली.
अशी आहे परंपरा
रंगपंचमीला शेवटच्या दिवशी वडांगळीकरांना जावई मिळाल्याने त्याची गाढवावरून मिरवणूक काढून सर्वांनी आनंद लुटला.
होळी ते रंगपंचमी दरम्यानच्या 5 दिवसांत वडांगळी गावात कुठलाही जावई चुकूनही फिरकत नाही. असा कोणी जावई फिरकलाच तर त्याला पकडून थेट बंदिस्त केले जाते व संपूर्ण गावातून गाढवावर बसवून त्याची धिंड काढली जाते. त्यामुळे या अनोख्या उत्सवासाठी जावई मिळणे कठीणच असते. त्यामुळे एखादा जावई शोधून त्याला काहीतरी खोटे सांगून गावात घेऊन आणले जाते.
असा गवसला जावई
गावातील बाळासाहेब यादवराव खुळे यांची मुलगी निफाड तालुक्यातील चितेगाव येथे दिली आहे. जावई दौलत बाजीराव भांबरे हे नाशिक येथील एका कंपनीत कामाला असून त्यांना जमीन खरेदी करायची आहे. यासाठी त्यांना गावातील काहींनी हिवरगाव येथे जमीन असून तुम्ही बघायला या असे सांगून त्यांना बोलावून घेतले. यानंतर गावातील काही तरुणांनी त्यांना गाठत तुम्हाला तुमच्या सासऱ्यांनी बोलवले आहे, सांगून जावयाला थेट वडांगळी येथे आणले.
गावात उतरल्यावर मात्र, गर्दी जमा झाल्याचे पाहून भांबरे यांना काहीतरी भानगड आहे याची जाणीव झाली. आता आपण पुरते फसलो गेलो याची जाणीव झाल्याने आलेल्या संकटाला तोंड द्यावेच लागेल याची तयारी त्यांनी ठेवली. बळजबरी करू नका, अशी विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली. पण कोणाचे ऐकतील ते वडांगळीकर कसले? त्यांनी जावयाला सर्व प्रथा व जावयाचा मान किती मोठा आहे, हे भाग्य कोणाच्या नशिबात नसते. हीच सुवर्णसंधी असल्याचे सांगून मिरवणुकीसाठी राजी केले.
धनंजय खुळे, मनोज खुळे यांच्यासह काही तरुणांनी सायखेड्यातून अकराशे रुपये भाडेतत्वावर गाढव आणले. गााढव मिळाले व जावईपण मिळाल्याने मिरवणुकीचा अडथळा दूर झाला. जावयाचा साजशृंगार करून सुशोभित गाढवावर बसवून मिरवणुकीस धुमधडाक्यात ढोलताशांच्या गजरात, विविध रंग व गुलालाची उधळण करीत प्रारंभ झाला. सुमारे तीन तासांची धमाल करीत मिरवणूक सासरे बाळासाहेब खुळे यांच्या दारासमोर विसावली.
संपूर्ण गाव असे सजले
अंगणात सडा टाकून, विविध रंगी रांगोळीने आंगण सजले होते. पाटाभोवती नक्षीदार रांगोळी काढली होती. मिरवणूक दाराशी आल्यावर जावयाला सन्मानाने उतरवून पाटावर आंघोळीसाठी बसविले. अंगाला सुगंधी उटणे, साबण लावून सुवासिनींनी गरम पाण्याने स्नान घातले. जावयाला नवीन पोषाख, टॉवेल टोपी देऊन ग्रामस्थांनी प्रेमाने निरोप देऊन त्यांचे आभार मानले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी शिवसेना शाखाप्रमुख गिरीश खुळे, दिलीप खुळे, शुभम खुळे, सचिन खुळे, अजित खुळे, विनोद खुळे, बाळू खुळे, विष्णु खुळे, सुरेश कहांडळ, मंगेश देसाई, शशिकांत खुळे, अश्विनी खुळे, मंदा गायकवाड, रतनबाई खुळे, कल्याणी खुळे, नंदा खुळे यांनी परिश्रम घेतले.
गावात इतरही प्रथा
गावे व त्यांच्या रूढी-परंपरा हा संशोधनाचा भाग आहे. या रूढी- परंपरा पाळताना अनेकदा त्यांचे शास्त्रीय कारण सांगता येत नाही; मात्र त्या पाळाव्या लागतात. ती गावची गरज असते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी गाव त्याच्या सभोवती असलेल्या अनेक गाव, त्यांची नावे पण खूपच वेगळे आहे. किर्तांगळी, चोंढी, मेंढी, खडांगळी अशी नावे असून वडांगळी हे गाव प्रमुख आहे. येथील नागरिक व त्यांची ख्याती दूरवर पसरली आहे. तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रत्येक गोष्टीत वडांगळी हे गाव अग्रेसर आहे. अनेक परंपरांनी गाव समृद्ध आहे. सतीमाता यात्रा, जावयाची गाढवावरून धिंड, एकाच गावात दोनदा पोळा अशा विविध प्रथा आजही मोठ्या श्रद्धेने जपल्या जाताहेत. जगभरात वडांगळी गावाची ख्याती दूरवर पसरलेली आढळते.