शिरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कंटेनरने तब्बल ९ वाहनांना धडक देत हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. पळासनेर येथे मध्यप्रदेश बॉर्डर जवळ हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींवर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
गेल्या काही दिवसांमध्ये महामार्गांवरील अपघात मोठी वाढ झाली आहे. सुमारे तीन दिवसांपूर्वीच मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन यात सुमारे २६ जण मृत्युमुखी पडले होते. अशाच प्रकारचे अपघात दोन तीन दिवसात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हयात देखील घडले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.
पळासनेर येथे मध्य प्रदेश राज्य सीमेवर हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने तब्बल ९ वाहनांना धडक दिली. त्यात कारसह विविध वाहनांचा समावेश आहे. त्यानंतर हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहेय या अपघातामध्ये कंटेनरने अनेकांना चिरडले. आतापर्यंत या अपघातात १२ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढम्याची चिन्हे आहेत. २०हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले. काहींनी पोलिसांना तर काहींनी आपत्कालीन क्रमांकाशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांसह अॅम्ब्युलन्स आणि अन्य पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या अपघातामध्ये कंटेनरचा चक्काचूर झाला आहे.
या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव वेगातील कंटेनर बेदरकारपणे अन्य वाहनांना धडक देत पुढे जात आहे. त्यानंतर हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. या अपघातामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अवघ्या काही सेकंदातच हा सर्व प्रकार झाला. महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. अशाच वेळी हा अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनर चक्काचूर झाला आहे. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अजूनही मदतकार्य सुरू आहे. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.