धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही विचारांनी, तडजोडींनी तीन लोक एकत्र आले तरीही त्यांच्यात ठिणगी पाडणाऱ्या घटना घडतच असतात. आता राज्य सरकारचेच बघा ना. राज्यात शिंदे-फडणवीस-पवार असे सरकार आहे. गेल्या आठवडाभरापासून एक मंत्रिमंडळाचा विस्तार सोडला तर सगळे छानच चालले होते. पण सोमवारी धुळ्यात मात्र राष्ट्रवादीच्या झेंड्यावरून राजकारण रंगलेच.
सोमवारी धुळ्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यजमानपद अर्थाच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी दोघांचाही ताफा दाखल झाला. रस्त्याच्या दुतर्फा भाजप आणि शिवसेनेचे झेंडे लागले होते. जागोजागी स्वागतासाठी कमानी लागलेल्या होत्या. दोन्ही नेते सभागृहात पोहोचले. भाषणं सुरू झाली आणि अजितदादांनी झेंड्यांचा मुद्दा काढलाच.
‘गिरीश महाजन यांनी उत्तम आयोजन केले आहे. ते त्यात तरबेज आहेत. पण आता हे तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी आमच्या पक्षाचा झेंडा नक्की लावा,’ या शब्दांत गिरीश महाजन यांनी चिमटा काढला. अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात त्याचे स्पष्टीकरण दिले आणि पुढच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचा झेंडा लावला जाईल, असा विश्वासही दिला. मंत्री दादा भुसे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन पंधरा दिवसांपूर्वी झाले होते आणि तेव्हा राष्ट्रवादी सत्तेत नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सवय व्हायला वेळ लागेल
अजितदादांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप-शिवसेनेची युती २५ वर्षांची आहे, त्यामुळे झेंडे अंगवळणी पडले आहेत. राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला थोडा वेळ लागेल, या शब्दांत स्पष्टीकरण दिले. पुढच्या कार्यक्रमात मात्र तिन्ही पक्षांचे झेंडे लावले जातील असेही ते म्हणाले.
काम करताना घड्याळ बघत नाही
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा धरला. आम्ही ज्यांच्यासोबत निवडणुका लढवल्या त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. तुमच्यासारखे वेडेवाकडे केले नाही. आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करत असतो. तुमच्यासारखे घड्याळ बघून काम करत नाही, असे त्यांनी उद्धव यांच्यावर टीका करताना म्हटले.