धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात पोलीस प्रशासनातर्फे आतंकवादी घुसखोरी संदर्भात मॉकड्रिल घेण्यात आले. मात्र, यावेळी वेगळाच प्रकार घडला. या मॉकड्रीलमध्ये बंदुकधरुन उभ्या असलेल्या दहशतवाद्याला स्थानिक नागरिकाने चोप दिल्याचे समोर आले आहे. हे पाहून पोलिसही अचंबित झाले. त्यामुळेच त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आतंकवादी घुसखोरी संदर्भातील मॉकड्रिल घेण्यात आले. शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या स्वामीनारायण परिसरातील कॅन्टीनमध्ये हे मॉकड्रिल घेण्यात आले. अचानकपणे अशी परिस्थिती उद्भवल्यास पोलीस यंत्रणा व नागरिक कशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळतील याबाबतची चाचपणी पोलीस प्रशासनातर्फे या मॉकड्रिलच्या माध्यमातून घेण्यात आली.
बनावट आतंकवाद्यांनी स्वामीनारायण मंदिरात प्रवेश केल्याचे आणि ते या ठिकाणी लपले असल्याचे भासविण्यात आले. यावेळी तात्काळ नागरिकांनी पोलीस यंत्रणेला या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच काही क्षणातच पोलीस या ठिकाणी दाखल झाले. बनावट आतंकवाद्यांना काही वेळातच पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. परंतु यावेळी स्वामीनारायण मंदिर परिसरात आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर काही वेळातच हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नागरिकाचा चोप
बनावट दहशतवादी बंदूक हातात घेऊन उभा होता. मात्र, हा सर्व प्रकार अचानक घडत असल्याने मंदिराच्या ठिकाणी असलेले नागरिक व लहान मुले भयभीत झाले. खऱोखरच आतंकवादी असल्याचे वातावरण तेथे तयार झाले. मात्र, हा प्रकार बनावट असल्याचे लक्षात येताच एका नागरिकाने थेट बनावट दहशतवाद्याला मारहाण केली. लहान मुले या सर्व प्रकाराने घाबरल्याचे सांगत त्याने या बनावट दहशतवाद्याला मारहाण केली. हा प्रकार पाहून पोलिसही अचंबित झाले. त्यांनी तातडीने या व्यक्तीला बाजूला केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
dhule police mockdrill citizen beaten fake terrorist
swami narayan temple