धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्यासाठी आता नऊ वर्षांपूर्वीच्या नाशिकमध्ये घडलेल्या अपघाताची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. या आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे नाशिक पर्यंत आल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सह्याद्री अपार्टमेंटमधील निवासस्थानात त्यांनी हे पाऊल उचलले होते. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवीण कदम यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळून आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीत गंगापूर रोड येथील अपघाताचा गुन्हा त्यास कारणीभूत असल्याचे लिहून ठेवलं आहे. “माझ्या आत्महत्येस मी स्वतः जबाबदार असून इतर कोणालाही दोषी धरु नये, गंगापूर पोलीस स्टेशन येथील फेटल गुन्हा त्यास कारणीभूत आहे, असं पीआय प्रवीण कदम यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.”
त्यांच्या या सुसाईड नोटमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून नाशिक इथल्या गंगापूर रोड पोलीस ठाण्यातील कोणत्या अपघाताचा गुन्हा प्रवीण कदम यांना आत्महत्येस कारणीभूत ठरला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. प्रवीण कदम हे २०१३मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्याकडे दोन अपघाताच्या गुन्ह्यांचा तपास होता. यापैकी नेमका कोणता गुन्हा त्यांना आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरला याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांकडून काही दबाव होता का, तसंच या दबावातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे का अशा अनेक चर्चांना या घटनेमुळे उधाण आले आहे. प्रवीण कदम हे उत्तम बासरी वादक तसेच कॅसिओ वादक होते. त्यांना संगीताची आवड होती. तसंच प्रवीण कदम हे सर्पमित्र देखील होते. त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही. यासंबंधी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Dhule PI Praveen Kadam Suicide Case Nashik Investigation
Crime