अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
धुळे मनपातर्फे प्लास्टिक बंदी विरोधात शुक्रवारी धडक कारवाई करुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल केला जप्त करण्यात आला. शुक्रवारी आठ जुलै रोजी महानगरपालिकेचे उपायुक्त नांदुर्डीकर मॅडम यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात प्लास्टिक बंदी असताना देखील धुळ्यात मात्र सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिका प्रशासनातर्फे सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकान मालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड लोकमान्य हॉस्पिटल परिसरात अमोल दुध डेअरीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाच्या पथकाने महानगरपालिकेचे उपायुक्त नांदुरीकर मॅडम यांच्यासह संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी जवळपास अंदाजे दोनटनहून अधिकचे प्लास्टिक पालिका प्रशासनाच्या पथकाद्वारे जप्त करण्यात आले आहे. या दुकान मालकास यापूर्वी देखील प्लास्टिक वापरा संदर्भात पाच हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता, परंतु त्यानंतर देखील या दुकान मालकातर्फे प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात असल्यामुळे पालिका प्रशासनातर्फे १० हजार रुपयांचा दंड या दुकान मालकास ठोठावण्यात आला आहे. तर सापडलेला पूर्ण मुद्देमाल पालिका प्रशासनतर्फे जप्त करण्यात आला आहे.