धुळे (इंडिया दर्पण वृतसेवा) – मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे ते शिरपूर दरम्यान गव्हाणे फाट्यानजिक भीषण अपघात झाला आहे. शिरपूर येथे कानबाईचा उत्सव आटोपून नाशिककडे निघालेली भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्याने ५ जण जागीच ठार झाले. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ३ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश होता, मात्र दुर्दैवाने या चिमुरडीचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
एकूण ५ जणांच्या मृत्यूच्या दुर्देवी घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दोन जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत रात्री उशिरापर्यंत नरडाणा पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. शिरपूरहून कानुबाई मातेचा उत्सव साजरा केल्यानंतर नाशिकच्या दिशेने एक भरधाव वेगाने कार आली. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली. ही घटना नरडाणा गावाजवळील गव्हाणे फाट्यावर सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
देवीदास धोंडू माळी (वय ५७, रा. सोनगीर, ता. धुळे), संदीप शिवाजी चव्हाण, त्यांची पत्नी मीना संदीप चव्हाण, गणेश छोटू चौधरी (सर्व रा. नाशिक) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर मयत चव्हाण दाम्पत्याची मुलगी जान्हवी (वय ३) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दाम्पत्याचा मुलगा गणेश (वय ६) व दुसरी कन्या साक्षी (वय १०) हे दोघे रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
या अपघाताची अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, संदीप चव्हाण हे पत्नी मिना आणि एक चार वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुली असे चौघे मित्राची कार (क्र.एमएच 02 डीएस 1277) घेवून शिरपूर येथे शालक दशरथ नाना कोळी यांच्याकडे कानबाई मातेच्या उत्सवासाठी आले होते. आज उत्सव आटोपून ते कारने नाशिकला घराकडे निघाले होते. कार ही संदीप चव्हाण हेच चालवित होते. त्यादरम्यान सुराय गव्हाणे फाट्यानजीक पुलावरून खाली उतरतांना त्यांचे नियंत्रण सुटले.
त्यामुळे भरधाव कार रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. त्यात कारमध्ये बसलेले चव्हाण दाम्पत्य व अन्य गणेश चौधरी हे गंभीर जखमी होवून ठार झाले. तर ट्रॅक्टरखाली दुरूस्तीचे काम करणारा चालक चालक पांडुरंग माळी हे देखील जागीच ठार झाले. तर चिमुकल्यांसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भिषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नरडाणा पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. गंभीर जखमींना तत्काळ धुळे जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काळी काळ विस्कळीत झाली होती. तसेच अपघाताचे वृत्त कळताच चव्हाण यांचे शालक दशरथ कोळी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर अपघातातील कारमधील मयत गणेश चौधरी हे चव्हाण यांचे नातेवाईक नाहीत. ते प्रवासी म्हणून बसले असावे, असा अंदाज लावला जात आहे.
Dhule Majr Accident Car Tractor 5 Death 3 Injured Road Accident Shirpur