धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अनधिकृतरित्या सावकारी करणारा एलआयसी एजंट राजेंद्र बंब याच्याविरुद्ध पोलिसांनी फास आवळला असून, आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून त्याच्या बँक खात्याची चौकशी सुरू आहे. चौथ्या दिवशी शहरातील पतसंस्थामधील लाखोंची रोख, सोन्याचे दागिने आणि कागदपत्रे असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
अवैधरित्या सावकारी करणाऱ्या आणि एलआयसीचा एजंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र बंब याच्याविरोधात तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. त्याच्या विविध बँक खात्याची ३ जून रोजी तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये आढळलेले दहा कोटी ७२ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याच्या पाच बँक खात्याच्या झडतीत कोट्यवधींच्या नोटा आढळल्या आहेत.
मंगळवारी धुळ्यातील विविध पतसंस्थांच्या खात्यांची झडती घेण्यात आली. या कारवाईत २१४ सौदा पावत्या, २ कोटी ४७ लाख रुपये रोख, चार ते पाच परदेशी चलन, चार ग्रॅम वजनाचे ३४ सोन्याचे नाणे, २ ते अडीच कोटी रुपयांच्या मुदतठेवीच्या २ हजार ४०० पावत्या, असा एकूण साडेचार कोटी रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे. बंब याच्याकडून आतापर्यंत २० कोटी रुपये जप्त केले असून त्याच्या सर्व मालमत्तांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली आहे.
धुळ्यामध्ये राजेंद्र बंब हा एलआयसी एजंट किंग म्हणून ओळखला जातो. तो नागरिकांना व्याजाने कर्ज देतो. अनेक वर्षांपासून तो खासगी सावकारी करत होता. कर्ज देताना तो नागरिकांच्या मालमत्तेची कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेत असे. कर्ज फेडल्यानंतरही त्याने अनेकांचे घराची कागदपत्रे परत दिलेली नाहीत. बंब याच्याकडे काम करणाऱ्या दुसाने नावाच्या व्यक्तीने त्याच्याकडून कर्ज घेतले होते. त्याने दुसाने यांच्या घराची कागदपत्रे मागून घेतली होती. दुसाने यांनी व्याजासह कर्जाची परतफेड केल्यानंतरही ती कागदपत्रे त्याने परत केली नाहीत. त्यामुळे दुसाने यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र बंब याने कोरोना काळात पोलिसमित्र म्हणून काम केले. त्याबद्दल त्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शहरात अवैध सावकारी करून कोट्यवधींची माया गोळा करणाऱ्या राजेंद्र बंब याच्याकडे प्राप्तीकर विभागाचे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.