धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील निजामपूर गावाजवळ असलेल्या चिखलीपाडा शिवारात आज एक भयानक दुर्घटना घडली आहे. येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर २ महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. हा कारखाना पुणे येथील एका महिलेच्या मालकीचा आहे. या कारखान्यात जैताणे गावातील महिला कामगार कामाला होत्या.
आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास कारखान्यात काम सुरू असताना अचानक त्या कारखान्यात शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यात त्या ठिकाणी काम करणार्या आशाबाई भैय्या भागवत (वय ३४), पुनम भैय्या भागवत (वय १६), नैनाबाई संजय माळी (वय ४८), सिंधूबाई धुडकू राजपूत (वय ५५) सर्व (रा.जैताणे ता.साक्री ) या चार जणींचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर संगीता प्रमोद चव्हाण (वय ५५) ही ७० टक्के व निकीता सुरेश महाजन (वय १८) ही ३० टक्के भाजल्या असून दोघींना उपचारासाठी नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटने आग लागली आणि या आगीत होरपळून या चौघी महिलांचा मृत्यू झाला. चौकशीअंतीच आगीचे स्पष्ट कारण समोर येईल. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. एका छोट्या खोलीत चमकणारी मेणबत्ती म्हणजे वाढदिवसाच्या वेळी वापरण्यात येणारी स्पार्कल कॅण्डल बनविण्याचा कारखाना सुरु होता. आगीची ठिणगी चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याच्या कच्चा मालावर पडली. यामुळे ही आग आणखी भडकली.
दुपारची वेळ असल्याने रणरणत्या उन्हात आग आणखीनच वाढली. सदर कारखाना पुणे येथील रहिवासी असलेल्या रोहिणी कुवर यांच्या मालकीचा असून, या कारखान्याचा कारभार जगन्नाथ रघुनाथ कुवर हे पाहतात. जगन्नाथ कुवर यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, हा कारखाना चालविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानगी घेतली काय? याचीही चौकशी पोलिस करीत आहेत. या दुर्घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Dhule District Company fire burn 4 Women’s Death 2 injured