धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरापासून काही किलोमीटर अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी झाला. ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे याठिकाणी डिझेल लुटण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. तसेच, महामार्गावर धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे.
मुंबईकडून इंदूरकडे डिझेल टँकर जात होता. हा टँकर मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला. त्याचवेळी चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा टँकर महामार्गावरच पलटी झाला. अचानक झालेल्या या अपघाताने महामार्गावर एकच गोंधळ उडाला. त्यातच या टँकरमधून डिझेलची गळती सुरू झाली. तातडीने ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. मात्र, पोलिस आणि अग्निशमन याठिकाणी मदतीस पोहचण्यापूर्वी महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. या दुर्घटनेत टँकर चालक जखमी झाला आहे. सुदैवाने जीवित हानी टळली.
स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. शिवाय डिझेल टँकरची गळती सुरू असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी डिझेल गोळा करण्यासाठी प्रचंड गर्दी केली. बादली, कॅन, डबे यासह जे मिळेल ते घेऊन नागरिक पलटी झालेल्या टँकरच्या ठिकाणी जमा होऊ लागले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिस आणि अग्निशमन येताच नागरिकांनी पळ काढला. तोवर अनेक नागरिकांनी डिझेल वाहून नेले.
dhule diesel tanker accident police mumbai agra highway video citizens