धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळ्यात काही समस्या उद्भवतात त्यातील एक महत्वाची समस्या म्हणजे विजेचा धक्का लागणे होय, वरवर पाहता अतिशय छोटी वाटणारी ही समस्या फारच गंभीर आहे. शहरातील साक्री रोडवरील बजरंग सोसायटीत बुधवार, दि.१९ जुलै रात्री दुर्दैवी घटना घडली. घरातील तारेवर ओले कपडे सुकवताना विजेचा शॉक लागला. यात सुनेसह सासूचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबदल हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या पावसात भिजत असताना विजेचा धक्का लागून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा अनेक घटना पावसाळ्यात घडत असतात. यासाठी काही काळजी घेणे अथवा काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तारेसह अंगावर पडल्या
धुळे शहरातील महिंदळे शिवार, साक्री रोड, शोभाबाई झिने ( वय ३९ ) या बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरातील ओले कपडे तारेवर सुकवत होत्या. मात्र तारेमध्ये विद्युत प्रवाह असल्याने शोभाबाई यांना विजेचा धक्का बसला. त्यावेळी सासू रुखमाबाई ( वय ६५ ) या तेथे बसल्या होत्या. शोभाबाई तारेसह रुखमाबाई यांच्या अंगावर पडल्या. त्यामुळे रुखमाबाई यांनाही विजेचा धक्का बसला. त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला.
त्याच वेळी परिसरातील लोक धावून आले. सदर घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत घरातील वीजप्रवाह बंद करून दोघींना बाजूला केले. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, राजश्री पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
ही काळजी घेणे आवश्यक
दरम्यान, काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु-सुनेचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. सुनिता मोहुर्ले आणि शकुंतला मोहुर्ले असे या महिलांचे नाव होते. घरासमोर बांधलेल्या तारेवरील वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी सुनीता सकाळी गेल्या होत्या. यावेळी तारेत विद्युत प्रवाह असल्याने त्यांना जोराचा धक्का लागला. त्यांना वाचवण्यासाठी सासु शकुंतला गेल्या असता त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच दोघींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पावसाळ्यात याबाबत खूप काळजी घ्यावी.पावसापुर्वीच घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग करून घ्या. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास ताबडतोब मेन स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा.घरातील स्वीच, वायर, तारा यांना ओलावा लागणार नाही याची काळजी घ्यावी, विजेच्या खांबांना जनावरे बांधू नका किंवा दुचाकी टेकवून ठेऊ नका. तसेच विजेच्या तारांवर कपडे वाळत घालू नये, वीज तपासून पाहण्याकरिता आपल्या हातांचा केव्हाही उपयोग करू नये. त्यासाठी टेस्टर सारखे उपकरण वापरावे, अशा विद्युत विभागाच्या सूचना आहेत.