धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुमच्या सोन्याच्या दागिन्यांची पूजा करून मंत्र मारून परत देतो, तुम्ही ते सोनं परिधान केल्यानंतर तुमचे सगळे कल्याण होईल व सुखी राहाल असे सांगून धुळ्यातील देवपूर येथे भोंदुबाबाने एका कुटुंबियाचे १८ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. विश्वास संपादन करुन ही फसवणूक केल्यामुळे याप्रकरणी अज्ञात भोंदुबाबा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पण, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या भोंदुबाबाला शोधून त्याला अटक केली.
पोलिसांनी या भोंदुबाबाला गुप्त माहिती आधारे शोध घेतला. त्यानंतर सोन्याचे दागिने व त्याचे ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या भोंदू बाबाचे नाव नारायण किसन चव्हाण (३५) असून तो जामनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील आहे. त्याच्या विरुद्ध तीन महिन्यापूर्वी देवपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल आहे.
अशी केली फसवणूक
फिर्यादी महिला सौ. किरण जडे व तिचे पती आणि मुलगा असे घरात असताना २९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता भोंदू बाबा साधूच्या रुपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य सांगण्याच्या बहाण्याने जडे यांच्याकडे आला. त्यानंतर जडे यांनी भविष्य बघण्यासाठी घरात बोलवले व पाणी दिले. तेव्हा या भोंदुबाबाने यांना तुमचे सगळे चांगले करतो असे सांगून हात चलाकी करून हातात कुंकू व तांदूळ घेऊन त्याची विभूती राख करून दाखविली. नंतर मंत्र उच्चार करून महादेवाची छोटी पिंड प्रकट करून दाखवली. तुमच्याकडून मला काहीच नको, मी सोन्याची पूजा करून मंत्र मारून तुमचे परीक्षा घ्यायला आलो आहे, असे सांगून तुमच्या अंगावरील सोने द्या, सोबत नेणार नाहीत व संध्याकाळी जेवणासाठी तुमच्या घरी येतो तुमच्या सोन्याची पूजा करून मंत्र मारून परत देतो. तुम्ही ते सोनं परिधान केल्यानंतर तुमचे सगळे कल्याण होईल व सुखी राहाल असे सांगून विश्वास संपादन केले. त्यानंतर सोन्याचे तीन ग्राम वजनाचे कानातील टाप्स व सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा एकूण १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जडे यांनी दिले. नंतर हा भोंदुबाबा फरार झाला. सायंकाळी जेवणासाठी वाट बघितली परंतु हा भोंदुबाबा आलाच नाही. त्याचे नाव, गाव, पत्ता माहीत नव्हते. तरी जडे कुटुंबियांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या भोंदुबाबाला गजाआड केले. देवपूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल होता.
Dhule Crime Deopur Bhondu Baba Superstition