धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरालगत असलेल्या अवधान परिसरातील दौलतनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळचे शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील असलेल्या गोपाळ कुटुंबियांनी सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या पाचही जणांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाच जणांपैकी एक जण अत्यवस्थ आहे.
दौलत नगरमध्ये गणेश रावळ गोपाळ हे कुटुंबासह राहतात. औद्योगिक वसाहतीत ते कामासाठी जातात. या कुटुंबातील गणेश रावल गोपाळ (वय ४२), गोविंदा गणेश गोपाळ (वय १२), जयश्री गणेश गोपाळ (वय १४), सविता गणेश गोपाळ (वय ३५ ) व भरत पारधी (वय २४) यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्यांना त्रास होत असल्याची बाब शेजारपाजारच्यांच्या निदर्शनास आली. त्यांचा घरमालकही तातडीने धावत आला. प्रसंगावधान राखत स्थानिकांनी तातडीने सर्व जणांना उपचारार्थ दाखल केले. हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार आहे की आणखी काही याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मोहाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, या सर्व प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.