धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साक्री तालुक्यातील कळंबीर गावात सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांच्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच करनवाल यांनी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करत पळ काढला. मात्र, वेळीच मदत न मिळाल्याने दुचाकीस्वार जगन पिराजी मारनर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. मीनल करनवाल या नंदुरबार येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. करनवाल या इनोव्हा कारने जात होत्या. त्याचवेळी कळंबीर गावाजवळ इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चालक जगन मारनर हे जोरात रस्त्यावर कोसळले. घटना गंभीर असल्याचे पाहून करनवाल यांनी तातडीने साक्री आणि निजामपूर पोलिस स्टेशनला फोन केला आणि वाहनाची मागणी केली. करनवाल यांनी जखमी अपघातग्रस्तास तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणे अपेक्षित असताना त्यांनी थेट पर्यायी वाहनाची व्यवस्था करुन अपघातस्थळ येथून पळ काढला. दरम्यान, वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने जगन मारनर यांचा मृत्यू झाला. या सर्व बाबीची गंभीर दखल मारनर यांच्या कुटुंबिय, नातेवाईक व स्थानिक ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळेच नातेवाईक व ग्रामस्थांनी साक्री पोलिस स्टेशन समोर म्हणजेच महामार्ग क्रमांक ६वर मारनर यांचा मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. अपघातातील दोषी करनवाल यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. आरोपीला अटक करण्याची ग्वाही पोलिस निरीक्षक अजयकुमार चव्हाण यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आणि मारनार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुजोरी आणि सर्वसामान्यांची ससेहोलपट याबाबत जोरदार चर्चा झडत आहेत. करनवाल यांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. मात्र, पोलिस अधिकारी सर्वसामान्यांचा रोष बघून सहायक जिल्हाधिकाऱ्यांना अटक करतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.