धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पारोळा रोडवरील बडगुजर प्लॉटमध्ये राहणाऱ्या आई जोगेश्वरी सर्व्हिस सेंटर (आपले सरकार)च्या संचालिका कुमारी रचना वंजी राणे (२१ वर्षे) हिचे आज अपघाती निधन झाले. घरासमोर कार पार्क करीत असताना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठ्या हिंमतीने घर सांभाळणाऱ्या रचना यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण धुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी रचना राणे यांचे वडिल वंजी माधव राणे यांचे १५ वर्षांपूर्वीच निधन झाले. राणे कुटुंबिय अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहत होते. वंजी राणे यांचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शैला वंजी राणे यांनी कुटुंबाला आधार दिला. घरगुती तसेच अन्य लहान मोठे कामे करुन त्यांनी श्रद्धा, श्वेता आणि रचना या आपल्या तिन्ही कन्यांना वाढविले. त्यातच कोरोनाच्या संकटामध्ये राणे कुटुंबावर मोठा आघात झाला. शैला यांचे निधन झाले. त्यामुळे तिन्ही बहिणी पोरक्या झाल्या. आई-वडिलांचे छत्र हरपले. पण, तिन्ही बहिणींनी खचून न जाता परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
तिन्ही बहिणींमध्ये रचना ही अतिशय हुशार आणि चाणाक्ष होती. तिने आपले शिक्षण करतानाच झेऱॉक्स तसेच ऑनलाईन सेवांचा व्यवसाय सुरू केला. मोठी बहिण श्रद्धा हिचे एमबीएचे शिक्षण झाले. त्यानंतर तिचे लग्न थाटामाटात करण्यामध्ये रचनाचा मोठा वाटा होता. त्याचपाठोपाठ श्वेता या बहिणीनेही एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. श्वेता आणि रचना या दोन्ही बहिणी आपले सरकार या ऑनलाईन सेवा केंद्राचा कारभार पाहत होत्या. त्यातच आज राणे कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे.
आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास श्वेता आणि रचना या आपली वॅगनर कार पार्क करण्यासाठी घराबाहेर आल्या. रचना ही कार चालवित होती. तर श्वेता तिच्या बाजूला बसलेली होती. ती कार चालवित असताना अचानक रचना हिचे कारवरील नियंत्रण सुटले. ही कार एका घराला जाऊन धडकली. या अपघातात कारच्या पुढील भागाचे थोडेसे नुकसान झाले. मात्र, रचना बेशुद्ध झाली. हे पाहून श्वेता घाबरली. तिने परिसरातील नागरिकांना मदतीसाठी आवाज दिला. तातडीने रचनाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रचनाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, रचनाचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण स्पष्ट होणार आहे. रविवारी सकाळी शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर रचना राणे हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
चालता बोलता रचना राणे हिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात तसेच संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Dhule Accident Young Girl Heart Attack Death
Rachana Rane