मुंबई – आयपीएल २०२१ चा समारोप झाला आहे. कोलकाता (केकेआर) आणि चेन्नई (सीएसके) यांच्यादरम्यान या हंगामाचा अंतिम सामना खेळला गेला. त्यामध्ये चेन्नईने कोलकाताला २७ धावांनी मात दिली. आयपीएलच्या या हंगामात वेंकटेश अय्यर आणि उमरान मलिकसारख्या खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांनाच आकर्षित केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माचा जलवा अजूनही कायम आहे. आज आम्ही तुम्हाला या हंगामातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगणार आहोत. तसेच मोठी रक्कम देऊन दोन्ही संघांनी घेतलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीचीही चर्चा करणार आहोत. आयपीएल २०२१ मधील सर्वात महागडा खेळाडून महेंद्रसिंग धोनी ठरला आहे. त्याच्या एका धावेची किंमत १३.१५ लाख होती.
पाच महागड्या फलंदाजांची कामगिरी
विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि डेव्हिट वॉर्नर या हंगामातील सर्वात महागडे खेळाडू होते. हंगामाच्या सुरुवातील हे सर्व खेळाडून आपल्या संघाचे कर्णधार होते. वाईट कामगिरीमुळे डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून पायउतार व्हारे लागलेच, शिवाय संघातील आपले स्थानही गमवावे लागले. या हंगमात वॉर्नरची एक धाव हैदराबादला ६.१५ लाख रुपयांना पडली. तर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत खूपच परवडणारे खेळाडू ठरले आहेत. रोहितची एक धाव ३.९३ लाख आणि पंतची एक धाव ३.५७ लाख ठरली आहे. विराटची एक धाव ४.१९ लाख रुपये ठरली. धोनीच्या खराब फॉर्मचे नुकसान चेन्नईला झाले नाही. तरीही त्याची एक धाव १३.१५ लाख रुपये ठरली आहे.
५ महागड्या अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी
क्रिस मॉरिस या हंगामातील सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. राजस्थानच्या संघाने त्याला विक्रमी १६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु या हंगामात त्याची कामगिरी इतकी चांगली झाली नाही. राजस्थानसाठी त्याचा एक गडी १.०८ कोटी रुपये तर एक धाव २४.२५ लाख रुपयांमध्ये पडली. त्यानंतर काइल जेमिसनला बंगळुरू संघाने १५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याच्या एका धावेची किंमत २३ लाख आणि एका गड्याची किमत १.६ कोटी रुपये होती.
ग्लेन मॅक्सवेल याने १०.७५ कोटी रुपयांना न्याय दिला आहे. त्याच्या एका धावेची किंमत २ लाख रुपये आणि एका गड्याची किंमत ३.५८ कोटी रुपये ठरली. चेन्नईने ७ कोटी रुपयांमध्ये मोईन अलीला आपल्या संघात समाविष्ट केले. या हंगामात मोईन अलीने चांगली कामगिरी केली. अलीची एक धाव १.९६ लाख आणि एक गडी १.१६ कोटी रुपये ठरले. रवींद्र जडेजा हंगामातील पाचवा महागडा खेळाडू ठरला. त्याची एक धाव ४.३१ लाख रुपयांची आणि एक गडी ७५ लाख रुपयांची ठरली.
हे सर्वात स्वस्त
चेन्नईचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने या हंगामात आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याची मोलाची कामगिरी केली आहे. त्याने सर्वाधिक ६३५ धावा कुटल्या आहेत. त्याची एक धाव फक्त ३,१४९ रुपयांची ठरली. त्याशिवाय बंगळुरूचा सलामीचा फलंदार देवदत्त पड्डिकल याने या हंगामात चमकदार कामगिरी आहे. त्याच्या एका धावेची किंमत ४.८ हजार रुपये ठरली. कोलकाताचा सलामीचा फलंदाज वेंकटेश अय्यर कामगिरीसुद्धा नेत्रदीपक ठरली आहे.
कोलकातासाठी त्याच्या एका धावेची किंमत ५,४०५ रुपये आणि एक गडी ६.६६ लाख रुपयांचा ठरला. हे तिन्ही खेळाडू २० लाख रुपयांच्या किमतीवर विक्री झाले होते. त्याशिवाय कोलकाताचा राहुल त्रिपाठीची एक धाव १५ हजार रुपयांची ठरली. त्याला फक्त साठ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले होते.