मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारण आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित अनेक किस्से खूपच रोचक असतात. त्यातून अनेकदा आतील माहिती मिळत असते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा धीरूभाई अंबानी यांच्याबद्दलचा असाच एक किस्सा एका कार्याक्रमादरम्यान सांगितला.
धीरूबाई अंबानी यांनी महामार्ग निर्मितीचे नितीन गडकरी यांना आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी कसे पूर्ण केले, याबद्दलचा हा किस्सा आहे. ही गोष्टी १९९५ ची आहे. युती सरकारच्या काळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक रस्त्यांची निर्मिती केली. तसेच उड्डाणपुलांचे जाळे निर्माण केले होते.
गडकरी म्हणाले की, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्माणासाठी त्यांनी धीरूबाई अंबानी यांच्या निविदेला नकार दिला होता. धीरूबाई अंबानी यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी ३६०० कोटी रुपयांची निविदा पाठवली होती. ती निविदा मी फेटाळली. धीरूबाई मोठ्या मनाचे व्यक्ती होते. त्यांनी मला बोलावले आणि ते निविदा नाकारल्यामुळे खूपच नाराज झाले होते.
गडकरींनी सांगितले की, मी धीरुभाईंना म्हणालो की, दोन हजार कोटी रुपयांमध्ये महामार्गाची निर्मिती केली तर मी तुम्हाला याची निविदा देतो. त्याच्या प्रत्युत्तरात ते म्हणाले, की सरकारची क्षमता नाही, तुम्ही रस्ता बनवू शकणार नाही. हे तुमच्यासाठी शक्य नाही. तुम्ही व्यर्थ प्रयत्न करत आहात. तुम्ही रस्ता बनवला तर मी तुमचे अभिनंदन करेन.
गडकरी धीरूभाईंना सांगतात, धीरूभाई मी खूप लहान माणूस आहे. मी प्रयत्न करेन. मी हा रस्ता बनवला, तर तुम्ही काय पैज लावाल? रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर धीरूभाई पाहणी करण्यासाठी गेले होते. तेच काम आम्ही दोन वर्षांत १६०० कोटी रुपयांमध्ये करून दाखवले. अशा प्रकारे आम्ही देशाचे दोन हजार कोटी रुपये वाचवले. धीरूभाई इतके चांगले होते, की नितीन तुम्ही जिंकलात, मी हरलो, असे त्यांनी मला बोलावून घेऊन सांगितले.