इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अचानक प्रकाशझोतात आलेले आणि सातत्याने वादात असणारे बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर महाराज यांच्या लग्नबाबत चर्चा रंगत आहेत. त्यांनीही मी सामान्य माणूस असून लवकरच लग्नही करणार असल्याचे स्पष्टच सांगितले आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सध्या माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मी कोणी साधू-संत नाही, अगदी सामान्य माणूस आहे. आपल्या ऋषीमुनींच्या परंपरेतही अनेक महापुरुषांनी घरात जीवन व्यतीत केले आहे. देवही गृहस्थाश्रमात दिसले. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वनप्रस्थ आणि संन्यास ही परंपरा आहे. यावरच आपणही पुढे जाणार आहे. लवकरच लग्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांना आमंत्रित करू, पण अधिक लोकांना आमंत्रित करू शकणार नाही. प्रत्येकासाठी लग्नाचे थेट प्रक्षेपण करू, अशी माहिती धीरेंद्र शास्त्री यांनी दिली.
१२१ गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह
बागेश्वर धामतर्फे गरीब मुला-मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. यंदा त्यात १२१ गरीब जोडपी विवहाबंधनात अडकतील सामूहिक विवाहाचे हे चौथे वर्ष आहे. या सामूहिक विवाहात नवीन जोडप्यांना कार, बाईक वगळता घरातील सर्व सामान दिले जाणार आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, कुलर, सोफा आणि डबल बेडही आंदण स्वरूपात दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यशक्तीच्या दाव्यामुळे वाद
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म १९९६ साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. धीरेंद्र यांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. ते दिव्य दरबारामध्ये सनातन धर्माचा पुरस्कार करत हिंदूंच्या संरक्षणासाठी सनातन धर्म टिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगतात. दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या धीरेंद्र महाराजांना अंनिसचे श्याम मानव यांनी आव्हान दिले होते. दैवीशक्ती सर्वांसमोर दाखविण्याचे त्यांचे आव्हान होते. यानंतर ते चर्चेत आहे. अलीकडेच संत तुकाराम महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करीत त्यांनी नवा वाद ओडवून घेतला.
दिव्य दर्शन पूज्य सरकार के….लाखों जनमानस एक झलक पाने को बेताब…https://t.co/xIfiTvlCBF#bageshwardhamsarkar #bageshwardham
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) January 30, 2023
Dhirendra Shastri Bageshwar Baba on Marriage