इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा नाचतांनाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवरुन आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जिल्हयातील लोककलावंताना प्रोत्याहन देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी व्यासपीठावर गेले व कलाकारांनी त्यांना नाचण्याचा आग्रह केला. त्यांनी नंतर हा नाच केल्याचे आता सांगण्यात येत आहे.
दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, धाराशिवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले, घर उजाडलं, पिकं बुडाली आयुष्याची कमाई पावसात वाहून गेली. इतकी वाईट वेळ आली असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नाचत आहेत. शेतकरी रडत असताना जिल्हाधिकारी नाचत आहेत, यावरून यांना परिस्थितीचे किती गांभीर्य आहे हे स्पष्ट दिसत आहे.
इतके संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासन असताना सामान्य जनता, शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा ठेवू नये. या नाच गाण्यातून वेळ मिळेल तेव्हा पंचनामे होतील, तेव्हा मदत मिळेल. जसे सरकार तसे प्रशासन आहे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे असं असताना जिल्ह्याचा प्रमुख नाचत आहे, यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे.