धाराशिव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पारंडा तालुक्यातील लाखी गावात नागरी प्रशासनाने केलेल्या तातडीच्या विनंतीनंतर, भारतीय लष्कराने तात्काळ आणि समन्वयपूर्ण बचाव अभियान राबविले.
यामध्ये कमकुवत संरचनेच्या घराच्या छतावर अडकलेल्या १२ नागरिकांच्या जीवाला तात्काळ धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, प्रतिकूल हवामानातील अडचणींवर मात करत ‘थार रॅप्टर्स ब्रिगेड’च्या आर्मी एव्हिएशन हेलिकॉप्टर्स तातडीने तैनात करण्यात आली. शिवाय लष्करी वैमानिकांनी उल्लेखनीय कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवत, एकूण २७ नागरिकांची यशस्वी सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.
या कारवाईतून पुन्हा एकदा नागरिकांचे प्राण वाचविणे आणि योग्य वेळी मानवतावादी मदत उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय लष्कराची अतूट वचनबद्धता दिसून आली. त्याचबरोबर गती, अचूकता आणि नागरी प्रशासनासोबत अखंड समन्वय साधत, नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी भारतीय लष्कर नागरिकांसाठी नेहमीच एक भक्कम आधारस्तंभ ठरले आहे.