पंडित दिनेश पंत, नाशिक
धनत्रयोदशी अर्थात अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दीपावलीचा दुसरा दिवस. मंगळवारी (२ नोव्हेंबर) धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजनाचा दिवस आहे. या दिवसाचे विविध प्रकारे शास्त्रामध्ये महत्त्व सांगितले आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान व सायंकाळी धन्वंतरी पूजन केले जाते. आपल्या कुटुंबातील कुणाही व्यक्तीला अपमृत्यू येऊ नये, म्हणून मृत्यू देवता यमाचे पूजन केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सुवर्ण रत्न, धने, नवीन कपडे, नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रघात आहे.
अशी करा पूजा
सकाळी आंघोळ झाल्यानंतर पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदळाचे स्वस्तिक काढले जाते. त्यावर मातीचा दिवा त्यात तिळाचे तेल, वात घालून प्रज्वलित केला जातो. दिव्यामध्ये खडीसाखर व सुटे नाणे ठेवले जाते. पाटावर फुलांची आरास केली जाते. यावेळी लावण्यात येणार्या या दिव्याचे म्हणजेच यमदीपाचे तोंड दक्षिणेकडे म्हणजेच यम दिशेकडे करावे. घरातील कोणत्याही सदस्यांना अपमृत्यू येऊ नये, यासाठी या देवतेची आराधना करावी.
असे करा धन्वंतरी पूजन
सायंकाळी धन्वंतरी पूजन करावे यामध्ये आरोग्य देवता धन्वंतरी यांचे मूर्ती सोबतच पाच आयुर्वेदिक वस्तू त्यामध्ये शतावरी, अश्वगंधा, खडीसाखर, हळकुंड व कडुनिंब पाला, धने यांचा नैवेद्य दाखवावा.
मुहूर्त असा
यंदाचा धनत्रयोदशी तसेच धनवंतरी त्याचप्रमाणे कुबेर पूजनाचा मुहूर्त – सायंकाळी ६.१६ मिनीटांपासून रात्री ८:११ पर्यंत आहे. त्याचप्रमाणे यमदीप लावण्याचा मुहूर्त सायंकाळी ५.३५ पासून रात्री ८.११ पर्यंत आहे.